चोपडा अर्बनच्या व्यवस्थापकांसह तिघांना अटक

0

माजी मंत्री खडसे फसवणूक प्रकरण ; मुक्ताईनगर पोलिसांनी आरोपींची केली कसून चौकशी ; हलगर्जीपणा भोवला

मुक्ताईनगर- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अडकावण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करून उच्च न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बुधवार, 13 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुक्ताईनगर पोलिसांकडून या गुन्ह्याचा खोलवर तपास सुरू असतानाच चोपडा अर्बन बँकेतून धनादेश गहाळ वा चोरी झाल्यानंतर त्या संदर्भात गुन्हा दाखल न करणार्‍या व कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या बँक व्यवस्थापक अविनाश भालचंद्र पाटील (45), योगेश काशीनाथ बर्‍हाटे ( 40) व किशोर लक्ष्मण अत्तरदे (47, तिघे रा.चोपडा) यांना अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले तर तपासाधिकारी निरीक्षक अशोक कडलग यांनी आरोपींची बारकाईने चौकशी केल्यानंतर त्यांना सायंकाळी अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे आहे नेमके प्रकरण
खडसेंनी अपसंपदा जमवल्याचा आरोप करीत दमानियांनी त्यांच्याविरुद्ध क्रिमीनल पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन दाखल केले होते. त्या दाव्यात सादर करण्यात पुराव्यांमध्ये खडसेंच्या खात्यात चोपडा अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि.चोपडाद्वारे साडेनऊ कोटी रुपये रकमेचा धनादेश जळगाव अ‍ॅक्सीस बँक शाखेच्या नावाने अदा करण्यात आल्याचे भासवून उच्च न्यायालयाची फसवणूक करण्यात आली तसेच दहा लाखांच्या डिमांड ड्राप्ट खडसेंच्या खात्यात जमा झाल्याचे दर्शवून न्यायालयाची फसवणूक करण्यात आल्याचे दमानियांनी भासवले होते. या प्रकरणाची कागदपत्रे खडसे यांना प्राप्त झाल्यानंतर खडसे यांनी दमानियांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा आरोपींनी बनावट धनादेश बनवल्याचा वा चोरल्याचा आरोप असून या धनादेशावर किशोर अत्तरदे, योगेश बर्‍हाटे व एस.आर.वानखेडे यांचा साक्षीदार म्हणून उल्लेख असल्याने गुरुवारी तीन आरोपींना ताब्यात घेवून त्यांची या प्रकरणासंदर्भात कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना सायंकाळी अटक करण्यात आली.