चोपडा तालुक्यातील गावांच्या पेयजल योजनेसाठी प्रयत्न करू

0

विधानसभेत आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांचे आश्वासन
लासूर गावात क्षारयुक्त पाण्यामुळे दरवर्षी मरतात २० ते २५ नागरिक

मुंबई:- चोपडा तालुक्यातील लासूर व ८ गावे, वढोदासह ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच गोरगावले व धानोरा या गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या टप्पा २ मध्ये समावेशित करण्याबाबतची बाब विचाराधीन असून अर्थमंत्र्यांशी चर्चा करून निधीसाठी तरतूद करू असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत दिले. चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी या गावांमधील पिण्याच्या पाण्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवला. या गावांचा संबंधित योजनांमध्ये समावेश व्हावा याकरिता प्रस्ताव स्थानिक स्तरापासून ते मंत्रालय स्तरापर्यंत दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः लासूर व सोबत ८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत असून लासूर या गावात विंधन विहिरीतील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने गावकऱ्यांमध्ये गुडघेदुखी, पोटदुखी, किडनीच्या विकाराचे प्रमाण वाढले आहे. किडनीच्या आजाराने लासूर गावात दरवर्षी २० ते २५ लोकांचा मृत्यू होत असल्याने सदर प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी करणारे पत्र सोनवणे यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांना २५ जुलै २०१७ रोजीच दिले होते. याबाबत शासनाने चौकशी करून कार्यवाही केली आहे का? असा प्रश्न सोनवणे यांनी केला. याला दुजोरा देत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यभरात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा-२ राबविण्याबाबत शासनाचा विचार असल्याचे सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी उपप्रश्न विचारत राज्यभरात राष्ट्रीय पेयजल योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. या योजनेसाठी केंद्राचा ५० टक्के निधी मिळतो मात्र त्यासाठी राज्याने आधी ५० टक्के निधी खर्च करावा लागतो. मात्र अर्थसंकल्पात निधीसाठी तरतूद केली नसल्याचे सांगितले. तर याबाबत काही तरतूद करणार आहात का? असा सवाल केला. यावर याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करून पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू असे पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले.