चोपडा हायस्कूलमध्ये केले वृक्षारोपण

0

इसिएतर्फे राबविला उपक्रम

चिंचवडः एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिशनने श्री. गेंदिबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमध्ये स्व. शंकरलाल मुथा यांच्या 9 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी शाळेच्या आवारात भारतीय वंशाच्या झाडांचे रोपण करून स्व. मुथा यांना श्रद्धांजली वाहिली. इसिएतर्फे शाळेतील वि÷द्यार्थ्यांना घन कचरा व्यवस्थापनाबाबत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाबाबत विनायक परचुरे यांनी भूमिका स्पष्ट केली. घरगुती घातक कचरा व इ कचरा या विषयावर पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधून इ कचर्‍याचे मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर होणार्‍या घातक परिणामांबाबत साध्या व सोप्या शब्दात माहिती दिली.

विद्यार्थी जमा करणार इ कचरा
प्रत्येक शाळेत प्रत्येक आठवड्याला इ कचरा विदयार्थी जमा करणार व तो सर्व कचरा इसिएतर्फे शास्त्रीय विघटनासाठी अधिकृत रिसायकलरला दिला जाणार, असे इसिए संस्थापक अध्यक्ष विकास पाटील यांनी शाळा प्रशासनास सांगितले. यावेळी संस्था सचिव राजेंद्र मुथा, नगरसेवक केशव घोळवे, विकास पाटील, शाळा प्राचार्य कैलास अनेचा, शाळा पर्यवेक्षक शशिकांत हुले, विनायक परचुरे, सुभाष चव्हाण, अनघा दिवाकर, मीनाक्षी मेरुकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन धनश्री कांबळे यांनी केले आणि उपस्थितांचे आभार संजय वाखारे यांनी मानले.