चोपडा । शहरालगत यावल रस्त्यावरील हिरा कॅाटन जिनींग फॅक्टरीला आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून सुमारे चार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आगीत सुमारे साडे सात हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही.
अग्निशमन बंबांना विलंब
हिरा कॅाटन फॅक्टरीत मजूर कापसाची यंत्राव्दारे सफाई करीत असताना शेजारच्या कापसाच्या ढिगाला अचानक आग लागली. मंद स्वरूपाची हवा सुरु असल्याने आगीने काही मिनिटांत रौद्र रुप धारण केले. त्यातच चोपडा पालिकेचे अग्निशमन बंब येण्यास वेळ लागल्यामुळे शेडमध्ये असलेल्या सगळ्या कापसाने पेट घेतला.जिनिंगमध्ये असलेल्या कुपनलिकेचे पाणी कापसावर मारण्याचा प्रयत्न अपूर्ण पडत होता.अखेरीस अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्यानंतर आगीपासून कापसाचा बचाव करण्यात आला. चोपड्यासह यावल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, शिरपूर, जळगावचे बंब धावले शेजारी असलेला कापूस टॅक्ट्ररने वेगळा करुन वाचविण्यात आला. जळत्या कापसाची धग कमी करण्यासाठी ओले बारदान (पोते) टाकण्यात आले तरीही रात्री उशिरा पर्यंत आग विझविण्याचे काम सुरुच होते. आग आटोक्यात आणण्यासाठी चोपड्यासह यावल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, शिरपुर, जळगावच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह पथकांनी मोलाची कामगिरी केली. उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराथी, कृउबा उपसभापती नंदकिशोर पाटील, जिनिंगचे संचालक सुनील जैन, सुनील अग्रवाल, पवन अग्रवाल, मुन्नासेठ अग्रवाल, प्रवीण देशमुख, गिरिष माळी, युवराज मराठे, कुशल जैन, श्रीकांत नेवे, सोमनाथ बडगुजर,विनोद टाटीया, संजय गुजराथी, अकिल जहागिरदार आदिंनी परिश्रम घेतले.