देवेंद्रभाई शहा हत्याकांड : 14 पथके मारेकर्यांच्या मागावर
पुणे : पुण्यातील बिल्डर देवेंद्रभाई शहा यांची हत्या ही त्यांनी कमिशन एजंट असलेल्या रवींद्र चोरगे व राहुल शिवतारे यांना वेळेवर पैसे न दिल्यानेच झाली असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. हे दोन्हीही मारेकरी फरार झाले असून, पोलिसांना हुलकावणी देत आहेत. पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, सोलापूर, सांगली व मुंबई या भागात त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकासह डेक्कन जीमखाना पोलिसांची तब्बल 14 पथके रवाना झालेली आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डशी निगडीत काही गुंडांशी या दोघांचे संबंध असल्याची माहितीही पोलिस सूत्राने दिली आहे. दरम्यान, शहा यांच्या हत्येमुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बिल्डर लॉबी चांगलीच हादरली असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे.
पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानेच हत्या?
देवेंद्रभाई शहा यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर रवींद्र चोरगे व राहुल शिवतारे हे आरोपी शनिवारी रात्रीपासून फरार झाले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागू शकला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांसह मुंबईतही त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 14 पथके रवाना झाली असून, संबंधित जिल्ह्याच्या गुन्हे शाखांनाही अॅलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील विविध भागातही या मारेकर्यांचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्या हालचालींची माहिती घेतली जात असून, अद्याप तरी त्यांचा ठावठिकाणा कळू शकलेला नाही.
आरोपींचे अन्य कुणा बिल्डरशी संबंध; पोलिस तपास सुरु
शहा हत्याकांडाचे सीसीटीव्ही फुटेज वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी पाहिले असून, घटनास्थळाचीही काळजीपूर्वक पाहणी केली आहे. त्यानुसार या दोघांची ओळख पोलिसांनी पटविली असून, दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. शहरातील कोणत्या बांधकाम व्यावसायिकांशी त्यांचे संबंध आहेत, त्याचीही माहिती पोलिस घेत आहेत. शहा यांनी या दोघांना ठरविलेले कमिशन वेळेवर दिले नव्हते. तसेच, कमिशनमध्येही वाढ करत नव्हते, या वादातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. या दोन्हीही आरोपींना पैशाची तातडीने गरज होती. तसेच, दोघापैकी एकाची पत्नी काही महिन्यापूर्वीच बाळंत झाली होती, असेही पोलिस सूत्राने सांगितले.