जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव परीसरातील तीन गावांसह भादलीत सात घरे फोडल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने शिरसोलीकडे मोर्चा वळवत एकाच रात्रीतून सात बंद घरे फोडून रोकडसह दागिने मिळून सुमारे तीन लाखांवर ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. परप्रांतीय टोळी कार्यरत झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे काम फत्ते करीत असल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एमआयडीसी पोलिसात घरफोड्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोलीत एकाच रात्री सहा बंद घरे फोडली
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील धनश्री हॉटेल जवळील प्लॉट भागात गुरुवारी रात्री 12 नंतर एकाचवेळी तब्बल सहा बंद घरांना टार्गेट करीत रोकडसह लाखो रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने लांबवली. हा प्रकार शुक्रवार, 10 जून रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर नागरीकांसह पोलिस वर्तुळात खळबळ उडाली.
या नागरीकांकडे घरफोडी
शिरसोलीतील राजेंद्र रामा बारी यांच्या घरातून 15 हजार रुपयांची रोकड, महेंद्र रामदास चव्हाण यांच्या घरातून 50 हजार रुपये रोख व 62 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, योगेश भीमराव देशमुख यांच्या घरातून 35 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सपना रवींद्र गोंधळे यांच्या घरातून 10 हजार रूपये किंमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून एक लाख 72 हजारांचा मुद्देमाल गेला तर सुधीर भावराव पाटील आणि पुनमचंद विठ्ठल देवरे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला.
पोलिस अधिकार्यांची धाव
घरफोड्यांची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी आदींनी धाव घेतली तर श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी महेंद्र रामदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.