चोरटे सैराट : घरफोड्यांसह तीन दुकाने फोडली

0

भुसावळातील गोविंद कॉलनीतून पाच लाखांची रोकड लंपास : खळवाडीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरी तर माळी कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने फोडली

भुसावळ- शहरातील उच्चभ्रू वस्तीतील कमल गणपती हॉल परीसरातील गोविंद कॉलनीत चोरट्यांनी पाच लाखांची घरफोडी करीत खळवाडी, वेडीमाता मंदिर परीसरातील सेवानिवृत्त शिक्षकाचेही घर फोडले तसेच राष्ट्रीय महामार्गावरील माळी भवनाजवळील कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने फोडून 11 हजारांच्या रोकडवर डल्ला मारत पळ काढला. सोमवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनांमुळे पोलीस प्रशासन हादरले असून पोलिसांच्या गस्तीलाच चोरट्यांनी आव्हान दिल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू असताना पोलिसांची यंत्रणा मात्र गुन्हेगारी रोखण्यात निष्प्रभ ठरली आहे. जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना नव्याने होणार्‍या चोर्‍या-घरफोड्या रोखण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे आहे. पोलिसांकडून होणारी गस्तच नावाला होत असल्याचा उघड आरोप नागरीक करीत असून गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. दरम्यान, धाडसी घरफोड्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ठसे तज्ज्ञ व श्‍वान पथकाने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. माळी भवनाजवळील कॉम्प्लेक्समध्ये चोरी करणारे दोन संशयीत सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळात ज्युस विक्रेत्याकडे धाडसी घरफोडी
भुसावळ- शहरातील शांती नगर भागातील कमल गणपती हॉल जवळील गोविंद कॉलनी भागातील रहिवासी अरुण यादव यांच्या बंद घरातून चोरट्यांनी पाच लाखांच्या रोकडसह तीन तोळे वजनाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. दुकान विक्रीतून आलेली रक्कम त्यांनी घरातच ठेवली होती तर ते कामानिमित्त ईटारसी गेल्याने चोरट्यांना आयतीच संधी मिळाली. घराचे दर्शनी भागाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील सामानाची फेकाफेक केली. दिवाणातील सर्वच साहित्य चोरट्यांनी बाहेर फेकले. पहाटे आजूबाजूच्या रहिवाशांना यादव यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी याबाबत अरुण यादव यांना दूरध्वनी करून माहिती दिल्यानंतर त्यांनी भुसावळात धाव घेतली.

घरफोडीनंतर पोलिसांची धाव
अरूण यादव यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक गंधाले व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. जंजीर नामक श्‍वानाला कपाटातील पैसे ठेवलेला कंप्पा हुंगवल्यानंतर तो घराच्या बाहेरील परीसरात फिरला. एलसीबी पथकातील पोलिस कर्मचारी यांनीही तेथे येऊन गुन्हेगारांची गुन्ह्याच्या पद्धत्तीची माहिती घेतली.

खळवाडी भागात डॉक्टरांचे घर फोडले
भुसावळ- शहरातील खळवाडी भागातील वेडी माता मंदिराजवळील पीएनटी कॉलनीतील रहिवासी व डॉ.नितीन वसंत चौधरी हे प्रशिक्षणासाठी उदयपूर गेले असून त्यांच्या पत्नी मुंबई येथे माहेरी गेल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाची तोडफोड करण्यात आली. कपाटातील पाचशे-सहाशे रुपयांची रोकड, चांदीचे शिक्के, देव्हार्‍यातील फोटो चोरट्यांनी लांबवला. सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. चोरीची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले आदींनी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, शहरातील रेल दुनिया परीसरातील एक बंद घरही चोरट्यांनी फोडल्याची माहिती असून तेथून मात्र काहीही चोरीला गेले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

माळी भवनाजवळ तीन दुकाने फोडली
भुसावळ- शहरातील माळी भवनाजवळील कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने चोरट्यांनी फोडत सुमारे 11 हजारांची रोकड लंपास केली. चोरीसाठी चोरट्यांनी लोखंडी टॉमीचा वापर करीत दुकानाचे शटर उचकावून दुकानात प्रवेश केला. नीलेश सुरेश भालेराव (पांडुरंग नगर) यांच्या मालकिच्या साई डेकोरेटर्स या दुकानाच्या गल्ल्यातून चोरट्यांनी नऊ हजार पाचशे रुपयांची रोकड लंपास केली तर दुकानातील साहित्याचीदेखील फेकाफेक करण्यात आल्याचे दिसून आले. शिवाय या दुकानाच्या बाजूलाच असलेल्या दिलीप माळी यांच्या चहाच्या दुकानातूनही चोरट्यांनी एक हजार 500 रुपयांची रोकड लांबवली तसेच वरुण महाजन यांच्या मालकिच्या दुकानात केवळ रीकामा सामान असल्याने तेथून काहीही चोरीस गेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी पहाटे 5.12 वाजता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून दोन चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. बाजारपेठ पोलिस ठाण्यासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.