चोरटे सैराट ; शहरात तीन बंद घरे फोडली

0

पोलिसांची गस्त ठरतेय तोकडी ; हजारो रुपयांचा ऐवज लंपास

भुसावळ :- शहरात चोरटे सैराट झाले असून त्यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. जुन्या चोर्‍यांचा तपास थंडबस्त्यात असतानाच दररोज नवीन होणार्‍या चोर्‍या पोलिसांसह नागरीकांना डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे पोलिसांची गस्त छेदून चोर्‍या होत असल्याने पोलिसांची गस्त नावालाच ठरत असल्याचा उघड आरोप आता रहिवासी करीत आहेत. गस्तीबाबत पोलिसांची एकूणच उदासीनता असताना दुसरीकडे डिटेक्शनदेखील होत नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. शहरातील गजानन महाराज नगरातील बंद असलेल्या तीन घरांना चोरट्यांनी टार्गेट करीत हजारो रुपयांचा ऐवज लांबवला तर दुसरीकडे सोमानी गार्ड परीसरात रहिवाशांना जाग आल्याने चोरट्यांना पळ काढण्याची वेळ आली.

बंद घरांना केले टार्गेट
शहरातील कोळी मंगल कार्यालयाजवळील गजानन महाराज नगर परीसरातील वीज कंपनीतील अधिकारी ए.जी. लढे यांच्या घराच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटातील सामानाची फेकाफेक केली. लढे हे पनवेल येथे राहात असल्याने घरी कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी साधली. भिंतीवरून चोरट्यांनी आत उड्या मारल्याने तेथे ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांचे नुकसान झाले शिवाय तुळशी वृंदावनात दुचाकीच्या चाब्या तसेच दोन स्क्रु ड्रायव्हर व काही खाण्याचे साहित्य मिळून आले. लढे हे पनवेल येथे असल्याने त्यांच्याशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी संपर्क साधून त्यांना चोरी झाल्याची माहिती दिली. घरात काही मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या का याचीही माहिती घेतली. घरात काहीही मौल्यवान वस्तू नसल्याची माहिती लढे यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे घरातून काहीही मौल्यवान वस्तू गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच भागात रमेश एकनाथ पाटील हे जळगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत कपाटे रीकामी केली तसेच दिवाणावरील गाद्या अस्ताव्यस्त फेकल्या होत्या. कटातील दोन हजार रूपये तसेच त्याच्या मुलाने जमविलेल्या विदेशी नाण्यांचा संग्रहातील दिनार, डॉलर्स लांबवले तसेच शशांक शिंदे यांच्या घराचेही कुलूप चोरट्यांनी तोडले मात्र चोरट्यांना घरात काहीही सापडले नसल्याचे सांगण्यात आले.

सहाय्यक अधीक्षकांनी केली पाहणी
सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक गंधाले, उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी चोरी झालेल्या घरांची पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलावून ठसे घेण्याच्या सूचना दिल्यात. या परीसरात कोठे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत त्याची माहिती काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्यात. रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार संजय पाटील तपास करीत आहे.

सोमानी गार्डन परीसरात चोरीचा प्रयत्न फसला
शहरातील सोमानी गार्ड परीसरातील रहिवासी सेवानिवृत्त तिकीट निरीक्षक भागवत रामा सरोदे यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न चोरट्यांचा फसला. चोरट्यांच्या पावलांचा आवाज आल्याने नगरसेविका वासंती शेखर इंगळे यांना जाग आली व त्यांनी पती शेखर इंगळे यांना जागे केल्याने आरडा-ओरड केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. सोमवारी पहाटे 2.25 वाजेच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील सहा ते सात चोरटे इंगळे यांच्या घराला बाहेरून कडी लावत असतानाच आवाज झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला तर नागरीक बाहेर आल्याने चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला. याबाबत माहिती कळाल्यानंतर शहर पोलिसांच्या गस्ती पथकानेही धाव घेतली मात्र तो पर्यंतच चोरटे पसार झाले.