जळगाव। शाहुनगरात अथर्व अपार्टमेंन्टमध्ये भाड्याने राहणार्या तरूणांच्या प्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी प्लॅटमधून चौघे तरूण झोपलेले असतांनाच तीन महागडे मोबाईल व पाच हजार रुपयांची रक्कम अर्ध्यातासात चोरून नेल्याची घटना गुरूवारी घडली. दरम्यान, सकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली आहे. तर याप्रकरणी तरूणांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, गेल्या एक ते दिड महिन्यापूर्वी देखील शाहुनगरात दरवाजा उघडे असलेल्या चार घरांमध्ये चोरट्यांनी अशा पध्दतीने चोरी केली होती.
असा ऐवज चोरी : चोरट्याने घरातून धिरज झांबरे याचे साडे तीन हजारांचा सॅमसंग मोबाईल तर 12 हजार रुपये किंमतीचा रेडीमी नोट मोबाईल असे दोन दोन मोबाईलसह पाचशे रूपये व पाकिट चोरून नेले आहे. तर मनोज वाघ यांचा देखील 18 हजार रुपये किंमतीचा महागडा मोटो मोबाईल आणि तीन हजार रुपयांची रोकडे लंपास केली असून स्वप्निल यांच्या पॅन्टच्या खिशातून पाकिट व हजार रुपये चोरून नेले आहे. याप्रकरणी तरूणांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मित्र सकाळी गेल्यानंतर झाली चोरी
शाहुनगरातील सहयोग क्रिटीकल हॉस्पीटलजवळ अथर्व अपार्टमेंन्ट असून यातील प्लॅट क्रं. 9 मध्ये स्वप्निल दिलीप पंडीत (रा.बर्हाणपुर), धिरज शशिकांत झांबरे (रा.पाल) व गजानन धुगे (रा. यवतमाळ) हे तिघे तरूण भाड्याने राहतात. दरम्यान, मित्राच्या लग्नासाठी तसेच कंपनीच्या कामानिमित्त या तिघांचा मित्र मनोज राजाराम वाघ (रा. नाशिक) हा देखील बुधवारी 17 रोजी रात्री 10 वाजता नाशिक येथून येवून प्लॅटमध्ये थांबला होता. तर मनोज हा अधून-मधून मित्रांना भेटण्यासाठी येत असतो. बुधवारी रात्री जेवन झाल्यानंतर चौघेही झोपून गेले. धिरज व मनोज याने झोपण्या अगोदर त्यांचे मोबाईल शेजारीच ठेवले होते. तर स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत असल्याने गजानन हा नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास युनिक अकॅडमी येथे अभ्यासिकेसाठी प्लॅटचा दरवाजा उडकवून निघून गेला.
तिघे झोपलेले असतांना चोरी
गजानन अभ्यासिकेत निघून गेल्यानंतर घरात (प्लॅट) धिरज, मनोज, स्वप्निल हे तिघे झोपलेले होते. सकाळी 7 वाजेच्या सुमारास मोबाईलचा अलार्म वाजल्याने मनोजला जाग आली आणि अलार्म बंद करून मनोज हा पुन्हा झोपून गेला. मात्र, यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचा व तिघेही गाढ झोपेत असल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश केला. यानंतर घरातील तीन महागडे मोबाईल व पाच हजारांची रक्कम तसेच दोन पाकिट चोरट्याने चोरून नेले. 7.30 वाजेच्या सुमारास धिरज याला जाग आल्यानंतर जवळच ठेवलेले मोबाईल दिसले नसल्याने त्याने शोधा-शोध करत स्वप्निल व मनोज याला उठवून मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी पँन्ट तपासल्या असता त्यातील पैसे व पाकिट देखील चोरीला गेल्याचे लक्षात आले.