बारामती । बारामती शहरात महिलांचे दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहे. महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवणार्या चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. बुधवारी व गुरूवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सलग दोन दिवस महिलांचे दागिने पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उषा प्रकाश तायडे (वय 52, रा. वाघापूर) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री 10 च्या सुमारास तायडे पायी जात आसताना मोटारसायकलवर तिघेजण आले, त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबार केला. अशाच प्रकारची दुसरी घटना बुधवारी रात्री 10.15 च्या सुमारास शहरातील क्रीडा संकुलाशेजारी घडली. याबाबत सविता कांबळे (रा. देसाई इस्टेट) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कांबळे यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र पळवून नेले.