चोरट्यांनी फोडले चहाचे दुकान

0

बारा हजार रूपये लंपास; तीन दिवसानंतर चोरट्यांचे पुन्हा डोके वर
पहूर – हिवरखेडा दिगर येथील धाडसी घरफोडीला तीन दिवस उलटत नाही तोच पहूर येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेले चहाचे दुकान फोडून चोरट्यांनी 12 हजार घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. तर अन्य एक किराणा दुकान फोडण्याचा ही प्रयत्न या चोरट्यांनी केल्याचे समोर आले असून पोलिसांच्या तपासालाच एक प्रकारे चोरट्यांनी आव्हान दिले आहेच पण नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी
बसस्थानक परीसराच्या जवळील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये सप्तशृंगी टी हाऊस दुकान आहे. दुकानात गणपती मंडळांना देणगी देण्यासाठी व दुकानातील दान पेटीत असलेल्या पैशांसह 12 हजार रूपये रोख होते. याठिकाणी नेहमी वर्दळ असते. चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानात असलेले रोख 12 हजार घेऊन पोबारा केला आहे. सलूनच्या दुकान मालकाने चहाचे दुकान मालक राजेंद्र पिंताबर कलाल यांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. घटनास्थळी साहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी पाहणी करून पंचनामा केल्याचे सांगण्यात आले आहे. पिंताबर गोविंदा कलाल यांनी याप्रकरणी पहूर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांना आव्हान
तीन दिवसांपूर्वी पहूर जवळील हिवरखेडा दिगर येथे धाडसी घरफोडीची घटना यशस्वी केल्याने चोरट्यांनी पहूरकडे मोर्चा वळवून एक चहाचे दुकान फोडण्यात यशस्वी झाले आहे. तर एक किरणा दुकान ही फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या घटनेतून थेट पोलिसांनाच चोरट्यांनी आव्हान दिले असल्याचे दिसून येत आहे. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.