जळगाव। महाबळ परिसरातील दौलतनगरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ चोरट्यांनी बुधवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घरफोड केली. चोरलेला ऐवज घेऊन जात असताना रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिस कर्मचार्याने त्यांना हटकले असता त्यांच्याकडून टॅमी आणि इतर घरफोडीचे साहित्य मिळाले. तर त्यांच्याकडून चोरलेला ऐवजही जप्त करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात घेतली धाव…
दौलतनगरातील पाण्याच्या टाकीजवळ भरत शांताराम पाटील (वय 33) हे कुटुंबियांसह राहतात. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. 2 जून रोजी ते कुटुंबियांसह गावाला गेलेले होते. हिच संधी साधत चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा तोडून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी ते गावाहून परत आले. त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन बघितल्यावर एक एलइडी टिव्ही, एक इस्त्री, कॅमेरा, पितळाची समई असा 28 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी चोरी झालेल्या वस्तू त्यांना दिसल्या. त्यांनी या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी तिन संशयितांना पकडल्याचेही त्यांना पोलिसांनी कळविले आहे.
अन् तिघांना पकडले
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुषार विसपुते महाबळ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी चैत्रबन कॉलनीजवळ असलेल्या सौरभ टेन्ट हाऊसजवळ तीन संशयीत जाताना दिसले. त्यांनी तिघांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दोघांना पकडून ठेवले. त्यानंतर पोलिस ठाण्यात फोनकरून आखणी पोलिस कर्मचार्यांना बोलावले. त्यानंतर हितेश बागूल, ज्ञानेश्वर कोळी, राकेश दुसाने, वासूदेव मोरे हे तत्काळ चैत्रबन कॉलनीत पोहोचले. त्यांनी सागर गायकवाड, राहूल काकडे आणि एका अल्पवयीन (तिघे रा. समतानगर) संशयिताला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून टामी तसेच घरफोडी करण्याचे हत्यारे सापडली. त्यांची चौकशी केली असता. त्यांनी दौलतनगरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीत एलइडी, इस्त्री, कॅमेरा, समई असा सर्व ऐवज हस्तगत केला.
सलग दुसर्या दिवशी चोरी…
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसर्या दिवशी चोरीची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री गणपतीनगर परिसरातील स्टेट बँक कॉलनीतील 28 ‘ब’मधील दीपेश माधवराव खेतान (वय 42) यांच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले. ते कुटुंबीयांसह रविवारी ओंकारेश्वर येथे लग्नाला गेले होते. चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून 1 लाख 52 हजारांचा ऐवज लंपास केला होता. आणि बुधवारी दौलतनगरात चोरी झाली. पोलिस कर्मचार्यामुळे चोरट्यांना रंगेहात अटक केली आहे. दरम्यान, या तिघा चोरट्यांची रामानंदनगर पोलिसांच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या चोरट्यांकडून आणखी काही घरोफोडींचे गुन्हे उघडकीस येण्याशी शक्यता आहे.