रावेर : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक पुन्हा चोरवड चेक पोस्टवर रोखण्यात आरटीओ प्रशासनाला यश आले आहे. 20 गुरांची निर्दयतेने होणारी वाहतूक रोखत या गुरांची जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आली. मंगळवारी सकाळी 11 वाजता रावेर तालुक्यातील चोरवड आरटीओ चेक पोस्टवर मध्यप्रदेशातून आलेला ट्रक (यु.पी.75 एम.1107) वरील चालक कागदपत्राची तपासणीसाठी वाहनाखाली उतरल्यानंतर आरटीओ निरीक्षक आर.डी.निमसे यांना चालकाच्या हालचालीविषयी शंका आली. यावेळी अधिकारी ट्रकजवळ पोहोचल्यानंतर कागदपत्रांची तपासणी न करता ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. यावेळी रावेर पोलीस ठाण्याचे फौजदार विशाल सोनवणे, पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, प्रदीप सपकाळे, श्रीराम कांगणे या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक ताब्यात घेऊन त्यातील 20 गुरांची सुटका करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.