जळगाव । औद्यागिक वसाहत परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे चोरीच्या तयारीत असणार्या तिघांना शनिवारी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. पोलिसांना तिघांकडून चावींचा गुच्छा, स्क्रु ड्रायव्हर, टॉमी मिळून आले आहे. दरम्यान, तिघांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्याची वैयक्तीक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
संशयितांकडून टॉमी, चावींचा गुच्छ जप्त
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल हेमंत कळसकर, किशोर पाटील, विजय पाटील व भास्कर ठाकरे हे पोलिस कर्मचारी शनिवारी रात्री औद्यागिक वसाहत परिसरात गस्तीवर होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपाच्या जवळ गस्त घालत असतांना राजकुमार रामखिलावन जयस्वाल (वय 20), कृष्णा नामदेव भोईटे (वय 22) दोन्ही रा.खडे कलोली, ता.कल्याण जि.ठाणे व शेख फारुख शेख बिसमिल्ला (वय22,रा.पिंप्राळा, जळगाव) हे तिघे संशयास्पदरित्या आढळून आले. दरम्यान, तिघांनी पोलिसांना पाहतच एकाने हातातील टॉमी लांब फेकून दिली. त्यांची चौकशी केली असता तिघांच्या बोलण्यात तफावत जाणवत होती. दरम्यान, रात्रीच या तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांनतर त्यांच्याकडून पोलिसांना चावींचा गुच्छा व स्क्रु ड्रायव्हर व टॉमी मिळून आले. यानंंतर पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी तिघांवर कलम 122 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर घरफोडीच्या प्रयत्नात असतांना तिघांना एमआयडीसी पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. तर तिघांना दुपारी न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांची न्यायालयीन कोठडीत रवागनी करण्यात आल्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असता तो मंजूर करत न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करुन सकाळी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले.