भुसावळ : भुसावळातील चोरलेल्या दुचाकीसह चोरट्याला पारोळा पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडले होते. आरोपीला भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने भुसावळसह जळगाव व पुण्यातील रांजणगाव पोलिस ठाणे हद्दीतून दुचाकी लांबवल्याची कबुली दिल्यानंतर पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. भूषण नितीन तावडे (21, चिरणे, ता.शिंदखेडा), पंकज तावडे व निखील तावडे (दोन्ही रा.चिरणे, ता.शिंदखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पारोळ्यात आवळल्या आरोपीच्या मुसक्या
भुसावळातील प्रवीण मदन चावरीया (पांडववाडा, हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यांच्या मालकिची दुचाकी 10 जुलै रोजी रात्री चोरीला गेली होती. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल असताना पारोळा पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत संशयीत भूषण तावडे हा चोरीच्या दुचाकीसह अडकला होता. आरोपीला अधिक तपासासाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यास खाक्या दाखवताच त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने पाच दुचाकी चोरीची कबुली देत दुचाकी काढून दिल्या.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील हवालदार सुपडा पाटील, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल दीपक शेवरे, कॉन्स्टेबल सागर देहाडे आदींच्या पथकाने केली.