चोरीच्या 15 दुचाकींसह चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी : एमआयडीसी सहा, जिल्हा पेठ सात, जळगाव शहरसह शनीपेठ पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघड

जळगाव : नाव पारदर्शी असलेतरी व्यवसायाने काळे काम करणार्‍या दुचाकी चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीने जळगाव शहरातून तब्बल 15 दुचाकी चोरीची कबुली दिली असून त्यास दुचाकींसह अटक करण्यात आली. पारदर्शी उल्हास पाटील (20) रा. पिंपळगाव बु.॥, ता.जामनेर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून अटक
चोरीच्या दुचाकीसह पारदर्शी हा चोरटा पिंपळगाव बुद्रुक येथून पहुरच्या दिशेने येत असतांना शेरी फाट्याजवळ त्याला अटक करण्यात आली. आरोपीने जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत सहा, जिल्हा पेठ पोलिस स्टेशन हद्दीत सात, जळगाव शहर पोलिस स्टेशनच हद्दीत एक व शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत एक असे एकूण 15 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, उमेशगिरी गोसावी,वसंत लिंगायत, महेश महाजन, अशोक पाटील, मुरलीधर बारी आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.