चोरीच सोने घेणार्‍या सराफांवर पोलीस दाखविणार का कारवाईची हिंमत?

0
शहरातील प्रसिध्द सराफ बाजारात काळाबाजार सुरू सोने घेणार्‍यालाही आरोपी न करणारे पोलीस कर्मचारीही दोषी?
शिस्तीचे भोक्ते पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी
किशोर पाटील | जळगाव । शहरात 2012 मध्ये डॉ. विजय चौधरी खून प्रकरणानंतर सराफ बाजारात चोरीचे सोने घेतले जात असल्याचे समोर आले होते. यात संबंधित व्यावसायिकाला आरोपी करण्यात आले होते. त्यानंतरही या प्रकाराला चाप लागला की, नाही हा प्रश्‍न अनुत्तरित असून, चोरीचे सोने खरेदी करणार्‍या सराफांबरोबरच त्यांना या गंभीर गुन्ह्यातून वगळणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
तांत्रिक मुद्याच्या आधारे करतात स्वतःचा बचाव
शहरातील काही सुवर्ण व्यावसायिक कमी दरात चोरीचे सोने खरेदी करत असल्याचे प्रकार यापूर्वी पोलीस चौकशीत उघड झाले आहेत. चोरीचे सोने विकणार्‍या संशयिताला अटक केल्यानंतर ते खरेदी करणारा सुवर्ण व्यावसायिकही कायद्यानुसार गुन्हेगार ठरतो. मात्र, अशावेळी हा व्यावसायिक सोने घेताना ते चोरीचे आहे हे माहित नव्हते, असे सांगून स्वतःचा बचाव करतो.
क्लीन चिट देण्याचा पोलिसांना काय अधिकार?
कुठल्याही प्रकारचे बिल अथवा पावती नसताना आणि काही एक चौकशी न करता सराफ बाजारातील काही व्यावसायिक बिनधास्तपणे चोरीचे सोने खरेदी करतात. त्याचा छडा लागल्यानंतर या व्यावसायिकांना सोयीस्कररित्या गुन्ह्यातून वगळणारे पोलीस कर्मचारी तेवढेचे दोषी ठरतात. त्यामुळे या व्यावसायिकांप्रमाणे पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाईची हिंमत कठोर शिस्तीचे भोक्ते असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दाखवावी असा सूर समाजातून उमटत आहे.
विजया चौधरी खूनप्रकरणात सोने व्यावसायिकालाही केले होते आरोपी
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विजया चौधरी यांचा 19 मार्च 2012 रोजी रुग्णालयातीलच शवविच्छेदनगृहात खून झाला होता. याप्रकरणी आरोपींनी डॉ. चौधरी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने शहरातील ज्या सोने विक्रेत्यास विकले होते त्या महेशकुमार वर्मा व प्रेमलता वर्मा यांनाही पोलिसांनी आरोपी केले होते. या घटनेमुळे जळगावच्या सराफ बाजारात चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे समोर आले होते. या घटनेचा संदर्भ घेवून आता सद्यस्थितीतील प्रकरणांची चौकशी होवून संशयास्पद व्यवहार करणार्‍या सुवर्ण व्यावसायिकांना आरोपी करण्यात यावे, असा सूर व्यक्त होत आहे.

——————

– कोट
सहआरोपी केल्यास सराफालाही होवू शकते शिक्षाचोराप्रमाणेच चोरीच सोन घेणाराही गुन्हेगार आहे त्यानुसार आरोपीकडून चोरीचे सोने सराफावर स्वतंत्र गुन्हा दाखल न होता. त्याला सहआरोपी केले व दोषी असल्याचे सिध्द झाल्यास त्याला कायद्यातील तरतुदीप्रमाणे शिक्षा होवू शकते. दागिने चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होण्याकामी पोलिसांकडून सोने घेणार्‍या सराफाला सहआरोपी केले गेले पाहिजे.
– अ‍ॅड. केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील
———-
चुकीने चोरीचे सोने घेतले तर पोलिसांना सहकार्य
शहरातील मुख्य सराफबाजारात व्यावसायिकांकडून चोरीचे सोने घेण्याचा कुठलाही प्रकार होत नाही, गल्ली बोळातील कारागीराकडून असे होत असेल. संशयिताने ज्या सराफाकडे बोट दाखविले की नाहक सराफाला त्रास होतो. एखाद्याकडून चुकीने जर चोरीचे सोने घेतले ही गेले तर आम्ही चोरीचा माल परत करुन पोलिसांना सहकार्य करतो. जर असला प्रकार कुण्या व्यावसायिकाकडून होत असेल जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन त्याला मुळीच सहकार्य करत नाही.
– लुनिया गौतमचंद, अध्यक्ष, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन
————–
नाहक निष्पापाला शिक्षा होवू नये हा उद्देश असतो. मात्र माहिती असूनही जर सोने व्यावसायिकाकडून चोरीचे सोने खरेदी केले जात असेल व चौकशीत ते सिध्द झाले तर त्याला संबंधित तपासअधिकार्‍यांनी सहआरोपी करायला हवे.
– दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक