खाणपट्ट्यात धडधडाट सुरू : लोकांना दम्याने त्रस्त
चर्होली : चर्होली परिसरातील चोविसावाडी हद्दीत व मोशी परिसरातील खाणपट्ट्यात क्रशरचा धडधडाट जोराने सुरू आहे. तसेच पुणे-आळंदी रस्त्याची व चर्होली फाटा ते चर्होली रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीने ज्येष्ठ नागरिक व लहान मुले श्वास आणि दम्याच्या आजाराने त्रस्त आहेत.
नागरिक, व्यावसाईक त्रस्त
फेब्रुवारीमध्ये महसूल विभागाने क्रशरचालकांवर कार्यवाही करत दीड कोटी रुपयाचा महसूल वसूल केला. या परिसरातील खाणपट्टा जवळपास संपला असला, तरी खाण मालक-चालक नवा पर्याय शोधत गायरान जमिनीला पोखरत आहेत. या भागातील गायरान जमिनीचे खुलेआम खोदकाम करून मुरूम, दगड काढले जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या क्रशरच्या जोराच्या आवाहने काळेभिंत भागातील नागरिक त्रस्त आहेत. या भागातून निघणारी प्रचंड धूळ चर्होली परिसरात परसत असून ती नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. नागरिकांबरोबरच रस्त्याच्या कडेला असलेले हॉटेल व इतर व्यावसायिकांनाही त्याचा त्रास होतो. तसेच त्यांना आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
रस्त्यांचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्याकडेही पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. क्रशरची उडणारी धूळ या भागातील नागरिकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरली आहे. अवैध पद्धतीने सुरू असलेले क्रशर तत्काळ बंद करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने करावी.
-शैला मोळक, अध्यक्षा भाजप महिला आघाडी
‘मोशी हद्दीत अधिकृत 11 क्रशर आहेत. त्यापैकी सात सुरू तर चार बंद आहेत. चोविसावाडी हद्दीत अधिकृत 14 क्रशर आहेत. या सर्वांनी बिगरशेतीसाठी प्रस्ताव दिले आहेत. मोशीतील क्रशरचालकांनी आगाऊ रॉयल्टी भरून जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी घेतली आहे.
– शंकर ठुबे, मंडलाधिकारी, भोसरी