चोवीस गुंठ्यातील ज्वारी भस्मसात

0

शॉर्टसर्किटमुळे लागली आगः संबधितांवर कारवाईची मागणी

चाकण : चाकण ( ता. खेड) हद्दीतील झगडेवस्ती जवळील अमोल नामदेव जाधव यांच्या मालकीच्या शेतातील ज्वारीच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने 24 गुंठ्यातील शेतामधील पीक जळून खाक झाले. या बाबत जाधव यांनी मंगळवारी (दि.6) खेडचे तहसीलदार सुनील जोशी यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित आगीच्या घटनेचा पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अमोल जाधव यांच्या तक्रारीनुसार चाकण येथील शेत जमीन गट नंबर 484 /3 जवळील भागात विजेचे रोहित्र आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो. कचर्‍याच्या वरील बाजूने गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन कचर्‍याला आग लागली. तीच आग लगतच्या ज्वारीच्या शेताला लागली. या आगीत 24 गुंठ्यातील तीन महिन्यांचे पिक पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

महावितरण व नगरपरिषद जाबाबदार असल्याचा आरोप
या घटनेला महावितरण आणि नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी जाधव यांनी केला आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा करून महावितरण कंपनी आणि चाकण नगरपरिषदेवर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.