चौकशीतून सत्य समोर येईल-मगर सहकारी बँक

0

भोसरी- भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेतील अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. परंतु, बँकेत कुठल्याही प्रकारे चुकीचा कारभार झाला नसून चौकशीनंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असा दावा मगर बँकेने आपल्या खुलाशामध्ये केला आहे.

अण्णासाहेब मगर सहकारी बँकेबाबत राहुल गव्हाणे यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१(३क) नुसार बँकेचे चाचणी लेखापरिक्षण आणि नंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ प्रमाणे सखोल चौकशी करण्याचे आदेश २५ मे २०१८ रोजी सहकार आयुक्तांनी दिले आहेत. त्याननुसार मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहार, जागा खरेदी, वाहन खरेदी, इमारत बांधकाम यांसाख्या बाबींमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे उघड असल्याचा आरोप राहुल गव्हाणे यांनी केला होता.

त्यावर मगर बँकेकडून रितसर खुलासा करण्यात आला. बँकेने केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, हा माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे व तक्रारदार राहुल गव्हाणे यांचा खोडसाळपणा आहे. संस्थेतील अस्तित्व संपत असल्याची जाणीव झाल्याने बाळासाहेब गव्हाणे यांनी प्रत्यक्ष सहभागी न होता राहुल गव्हाणे यांच्यामार्फत बँकेच्या विरुध्द तक्रारींचे सत्र सुरू केले आहे. तक्रारीनुसार सहकार खात्याने चौकशीची प्रक्रिया सुरू केली असन बँकेला त्यांचे पत्र प्राप्त झालेले आहे.

दरम्यान, चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल. बँकेची परिस्थिती मजबूत असून कोणत्याही अफवांवर ठेवीदार, सभासदांनी विश्वास ठेवू नये. तसेच, या तक्रारींच्या अनुशंगाने बाळासाहेब गव्हाणे व राहुल गव्हाणे यांच्याविरुध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार येणार आहे, असेही बँकेच्या खुलाशात म्हटलेले आहे.