चौकशी करून उपमहापौरांच्या फलकांवर कारवाई – आयुक्त 

0
पिंपरी-चिंचवड : उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी वाढदिवसानिमित्त लावलेले फलक अधिकृत आहेत. काही फलक अनधिकृत असल्यास त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील फ्लेक्स बेकायदेशीर ठरवत ते कार्यक्रमापुर्वीच तात्काळ काढून टाकण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपुर्वी दाखविली होती. परंतु, सत्ताधार्‍यांचे फलक काढण्यास विलंब करत प्रशासन दुटप्पी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
प्रशासनाची दुटप्पी भूमिका
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचे पिंपळेगुरव येथे फ्लेक्स लावण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, त्याचदिवशी सकाळी हे सर्व फ्लेक्स अनधिकृत असल्याचा दावा करत, हे फ्लेकस हटविण्यात आले होते. तर हे सर्व फ्लेक्स अधिकृत असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. या कारवाईमुळे महापालिकेच्या तत्परतेचीदेखील चांगलीच चर्चा रंगली होती.
नवे जाहिरात धोरण
या पार्श्‍वभूमीवर हर्डीकर म्हणाले, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचे शहरातील फ्लेक्स अनधिकृत असल्याची बाब मला माहित नाही. मात्र, हे फ्लेक्स अनधिकृत असल्यास, ते तत्काळ हटविण्यात येथील, असे त्यांनी सांगितले.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बहुतांशी फ्लेक्स अनधिकृत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे. त्यासाठी फ्लेक्स व होर्डींग्जबाबतचे नवे जाहिरात धोरण महापालिका आणणार आहे. त्यानुसार शहरातील फ्लेक्सला मंजुरी, त्यांचा आकारमान, दोन फ्लेक्समधील अंतर, नियमत्रण या सर्व बाबींचा समावेश असणार आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत फ्लेक्सच्या संख्येला चाप बसणार आहे, असेही ते म्हणाले.