चौपदरीकरणासह बायपासला मंजूरी

0

जामनेर । वाढती लोकसंख्या पाहता शहरात येणारी अवजड वाहने, हजारोच्या संख्येने शहरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आदींमुळे शहरात दररोज होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्यशासनाने शहराबाहेरुन चौपदरीकरणासह बायपास रस्त्याला मंजूरी दिली असल्याची महत्वपूर्ण माहिती राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत नगरपालिकेने 28 कोटींची वाघूर धरणातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणारी वाढीव पाणी पुरवठा योजना केली. या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण व भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया योजनेचा भुमीपूजन कार्यक्रम शिवाजी नगर कॉर्नरवर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या.

सबस्टेशन उभारणार
पूर्वी शहरात पाणीपुरवठा वितरीत करण्याचे 175 च्या जवळपास व्हॉल होते. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्यास विलंब होत होता. दोन महिन्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा शक्य होणार आहे. वाघूर धरणावर स्वतंत्र सोलर प्लॅन्टची व्यवस्था झाल्यामुळे विजेचाही प्रश्‍न सुटला आहे. तसेच 36 कोटी खर्चून केकतनिंभोरा तसेच वाकडी येथील सबस्टेशन लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे सांगितले. शहरात चौकाचौकात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविले जाणार असून जामनेर शहरात वायफाय फ्री होणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

सोनबर्डी विकसीत करणार
शहरातील अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दर्शनी भागामध्ये महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ, तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय या चार महापुरुषांचे पुतळे बसविणार आहे. नवीन तहसिल कार्यालय, नवीन पोलिस स्टेशन, अद्ययावत पोलिव क्वार्टरचे काम हाती घेतल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील रमणीय ठिकाण म्हणून सोनबर्डी विकसित करीत असल्याचे ना.महाजन यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
महिला बालकल्याण व बांधकाम समिती सभापती रजनी चव्हाण, जि.प.सदस्या विद्या खोडपे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, नगरसेवक छगन झाल्टे, गोविंद अग्रवाल, दिलीप खोडपे, चंद्रकांत बाविस्कर, गटनेता महेंद्र बाविस्कर, नगरसेविका कल्पना रमाकांत पाटील, डॉ.प्रशांत भोडे, जितेंद्र पाटील, दीपक पाटील, अशोक भोईटे, तुकाराम निकम, अलियार खान, नाजीम पार्टी, नवलसिंग पाटील, आतिष झाल्टे , यांच्यासह भाजप कार्यकर्ते, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

अजित पवार यांना टोला
राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना जामनेर नगरपालिकेसाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 30 लाखांच्या निधीची मागणी केली होती. मात्र त्यांनी ती नाकारली होती. आता त्यांच्या नाकावर टिच्चून विकास कामांसाठी 300 कोटींचा निधी मिळविल्याचा टोला ना.महाजन यांनी यावेळी अजित पवार यांना लगावला. यासोबतच अद्ययावत व सुसज्य ग्रंथालय व इ-लर्निंग सेंटर, स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोनबर्डीच्या चारही बाजूने ट्रक तसेच जलतरण तलाव, मल्टीपर्पज हॉल व भव्य शिवमंदिराचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात तालुक्याच्या विकासासाठी विकासात्मक योजना राबविण्यात येतील असे आश्‍वासनही त्यांनी दिले.