खडसे, भुजबळ व कल्पना ईनामदारातील संबंध तीन दिवसात जाहीर करणार

0

अंजली दमानियांचा रावेरमध्ये सूचक इशारा ; मनस्ताप होण्यासाठी 22 ठिकाणी बदनामीचे खटले

रावेर:- माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, कल्पना ईनामदार यांच्यातील संबंध तीन ते चार दिवसात जाहीर करून खळबळ उडवून देणार असल्याचा गौप्यस्फोट आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी सोमवारी दुपारी येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. रावेर येथे सोमवारी न्यायालयीन तारखेवर आलेल्या दमानिया यांनी न्यायालयीन काम आटोपल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 22 ठिकाणी आपल्याविरुद्ध बदनामी प्रकरणी खटले दाखल करण्यात आले. आपल्याला केवळ मानसिक त्रास व्हावा हा त्यामागील उद्देश होता मात्र खडसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे खटले दाखल केले मात्र एकही खटला त्यांनी दाखल केला नाही कारण तसे झाले असतेतर मी त्यांना जेरीस आणले असते, असा दावाही त्यांनी केला. 22 खटल्याप्रकरणी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबत संबंधितांना नोटीसादेखील इशू झाल्याचे त्यांनी सांगत येथे आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खडसे-भुजबळ-ईनामदारांमधील लिंक ओपण करणार
माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व कल्पना ईनामदार यांच्यातील संबंध (लिंक) आपण तीन ते चार दिवसात ओपण करणार असल्याचे सुतोवाच दमानिया यांनी येथे केले. खडसेंनी आपल्याविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी केली आहे मात्र सीबीआयच काय यापेक्षा मोठी चौकशी होईल व खडसें यांना भोगावेच लागेल, असे सूचक वक्तव्यही दमानिया यांनी केले. जून 2016 पासून खडसेंविरुद्ध लढा आपला सुरू असून गव्हर्नर यांच्याकडे आपण तक्रारीही केल्याचे त्यांनी सांगितले.

कल्पना ईनामदारांना उघडे पाडल्याने आरोप
माजी मंत्री खडसेंना अडकवण्याचे षडयंत्र दमानिया यांनी रचल्याचा खुलासा कल्पना ईनामदार यांनी काही दिवसांपूर्वीच केल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर दमानिया यांना प्रसिद्धी माध्यमांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, कल्पना ईनामदार या 2 डिसेंबर 2014 रोजी आपल्या घरी आल्या होत्या व भुजबळ केसमधून तुम्ही मागे व्हा, तुम्हाला हवे ते पोहोचवू, अशी ऑफर त्यांनी आपल्याला दिली होती, असा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला. याच दिवशी एका खाजगी वाहिनीवर इनामदार यांना आपण उघडे पाडल्याने त्यांनी आपल्यावर निरर्थक आरोप केल्याचे दमानिया म्हणाल्या. अण्णांच्या कोअर कमेटीतील या व्यक्तीबाबत आपण अण्णांना डिटेल्स माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.