नवी दिल्ली । भारताच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे महत्त्व अनन्यसाधारण असून महाराजांनी जातीभेदाच्या भिंती पाडून लोकांना लोकांशी जोडण्याचे काम केले, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. दिल्लीत शिवजयंतीच्या दिमाखदार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला दिग्गज नेते, महाराष्ट्रासह देशातील शिवप्रेमी उपस्थित होते. लष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावर्षी महाराष्ट्रासह दिल्लीही हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दुमदुमल्याचे प्रथमच दिसून आले.
राष्ट्रपती म्हणाले, छत्रपती शिवरायांची प्रतिमा मला भेट देण्यात आली या भेटीमुळे राष्ट्रपती भवनात जी उणीव होती ती भरुन निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा राष्ट्रपती भवनातच राहील. माणसाची योग्यता पाहून त्याला दरबारात किंवा सैन्यदलात ते स्थान देत असत. त्या माणसाची जात हा शिवाजी महाराजांसाठी कधीही महत्त्वाचा मुद्दा नव्हता. जातीभेदाचे उच्चाटन करण्यासाठीच ते कायम प्रयत्नशील होते त्यांनी माणसे माणसांशी जोडण्याचे काम केले. त्याचमुळे लोकांच्या मनात शिवाजी महाराजांबाबत एक महत्त्वाचे स्थान आहे. महाराज उत्तम प्रशासक होते त्यांनी एक चांगली यंत्रणा उभी केली होती. त्यांनी स्थापलेले अष्टप्रधान मंडळ हेदेखील यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. राजव्यवहार कोष शिवाजी महाराजांनी प्रकाशित केला या शब्दकोषात उर्दू, फारसी भाषेतले शब्द मराठी भाषेत भाषांतरीत करण्यात आले होते, अशा प्रकारे आणला गेलेला हा पहिला शब्दकोष होता. जातीभेद नष्ट करण्यावर त्यांनी भर दिला, असे राष्ट्रपती म्हणाले.