छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारण्याची गरज

0

पिंपरी-चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आज अंगीकारण्याची खरी गरज आहे. निर्व्यसनीपणा, निष्ठा आणि स्त्री-सन्मान हे गुण आत्मसात केले तरच ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला आहे, असे प्रतिपादन सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य आणि ज्येष्ठ व्याख्याते संतोष तोत्रे यांनी केले. काळभोरनगर, चिंचवड येथे सोमवार, (दि. 24) पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प संतोष तोत्रे यांनी ’छत्रपती शिवराय व आजचा तरुण’ या विषयावर गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, जीवन विद्या मिशन (पिंपरी-चिंचवड) अध्यक्ष बाळासाहेब मरळ, उद्योजक माऊली जोशी, इतिहास अभ्यासक प्रा. नामदेवराव जाधव, मुख्य संयोजक शंकर काळभोर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवरायांचे कर्तृत्त्व अभ्यासावे
संतोष तोत्रे म्हणाले की, अलेक्झांडर, सिकंदर आणि ज्युलियस सीझर या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराज हे महान होते, असे मत एका पाश्चात्य इतिहासकाराने व्यक्त केले आहे. असे असले तरी आजपर्यंत छत्रपती शिवराय हे आपल्याला फक्त 30 टक्केच समजले आहेत. शिवरायांना देवत्त्व बहाल करून आम्ही सामान्य माणूस आणि त्यांच्यात दुरावा निर्माण करतो. सामान्य माणूस देवाला वंदन करतो; पण देवासारखे कर्तृत्त्व करता येणार नाही, म्हणून निष्क्रिय होतो. माणूस या दृष्टिकोनातून शिवरायांचे कर्तृत्त्व अभ्यासले पाहिजे, असे मत तोत्रे यांनी व्यक्त केले.

गर्भवती मातांनी शिवचरित्र वाचावे
महाराष्ट्रातील समृद्ध गावे परकीय सत्तांमुळे वतनदारीत परावर्तीत झाली. संपत्ती आणि स्त्री सुरक्षित राहिली नाही. यामुळे बालविवाह, सतीची चाल या अनिष्ट प्रथा निर्माण झाल्या. पातशाह्यांच्या लढायांमध्ये आपलीच माणसे एकमेकांविरुद्ध लढू लागली. सरदार लखुजी जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्या मनात बालवयातच या अराजकाविरुद्ध संघर्षाची ठिणगी पडली. विवाहानंतर सभोतालच्या संघर्षमय वातावरणाचा परिणाम जिजाऊंच्या गर्भावर झाला; आणि त्या गर्भसंस्कारांतून सहाव्या अपत्याच्या रुपाने शिवबासारखा युगपुरुष जन्माला आला. यामुळे आताच्या गर्भवती मातांनी शिवचरित्र वाचले; तर चांगले गर्भसंस्कार होतील, असेही संतोष तोत्रे यांनी सांगितले.

जिवाभावाची माणसे जोडा
तरुणांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल; तर त्यांनी जिवाभावाची माणसे जोडायला शिकले पाहिजे. छत्रपती शिवराय कृतीतून जगता आले पाहिजेत, असे सांगून तोत्रे यांनी स्वामी विवेकानंद, प्रबोधनकार ठाकरे, प्रा. नरहर कुरुंदकर, सद्गुरू वामनराव पै यांचे संदर्भ देत अतिशय ओघवत्या आणि अभिनिवेशपूर्ण शैलीतून शिवचरित्रातील काही प्रसंग साकार करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आशा पागळे, प्रभाकर ढोमसे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले.