छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शासनाने भूमिपूजन करावे

0

चाळीसगाव । शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील धुळे रोड व स्टेशन रोड यामधील त्रिकोणी जागेत महाराष्ट्र शासनाच्या कला संचानालयाच्या यादीत असलेल्या संकल्पनेनुसार भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (शिल्प) अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे वरीलप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी संभाजी सेना अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत असून शेकडो पत्रव्यवहार शासनासोबत केलेले आहेत. याकरिता 19 फेब्रुवारी 2016 शिवजयंती दिनापासून सैनिकांनी 21 दिवस उपोषण करुन आत्मदहन आंदोलन केले होते. तसेच मुख्यमंत्री महोदय हे नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी चाळीसगाव येथे आले असता त्यांनी सांगितले होते की फाईल माझ्या टेबलावर आहे. आचारसंहिता संपताच त्यावर सही करून मंजुरी देतो. परंतु त्यानंतरही पुन्हा मुख्यमंत्री सदर विषय विसरून गेलेत त्यानंतर पाठपुरावा देखील केला होता. शिवाय मागील काळात पालकमंत्री तथा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असून पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

होणार्‍या परिस्थितीला शासन जबाबदार
18 फेब्रुवारी 2018 पर्यंत महाराष्ट्र शासनाने सदर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करावे जर शासनाने 18 फेब्रुवारीपर्यंत भूमिपूजन केले नाही तर 19 फेब्रुवारी 2018 शिवजयंतीदिनी सदर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन चाळीसगाव तालुक्यातील शिवप्रेमी बांधव आणि संभाजी सैनिक करतील. या आंदोलना प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणार्‍या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून निवेदनावर संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, तालुका अध्यक्ष गिरीष पाटील, सुरेंद्र महाजन, अविनाश काकडे, दिवाकर महाले आदिंच्या सह्या आहेत.

यांना पाठविली निवेदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा सहकारमंत्री चंद्रकांत पाटिल, आमदार उन्मेष पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, प्रकल्प संचालक हायवे थॉरिटी ऑफ इंडीया, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, नगराध्यक्ष नगर परिषद चाळीसगाव, मुख्याधिकारी नगर परिषद, उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव, उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलिस स्टेशन चाळीसगाव, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चाळीसगाव यांना दिले.