मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरुन मंगळवारी एक हजार विमानांनी उड्डाण आणि उतरण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे. याआधी ९८० विमान उड्डाण आणि उतरण्याचा विक्रम केला होता. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील विमानतळांपैकी एक सर्वात व्यग्र विमानतळ आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत या विमानतळावरून २४ तासात तब्बल १००३ विमानांचे उड्डाण आणि उतरण्याचा विक्रम केला.
या विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत. नियमित वाहतुकीसाठी मात्र एकच धावपट्टी वापरली जाते. गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटात ४ विमानांची वाहतूक होते. यात दोन विमान उड्डाणे करतात, तर दोन विमाने उतरतात. दर तासाला ४६ विमानांची वाहतूक नियंत्रित केली जाते. नियंत्रण कक्षात बसलेल्या हवाई वाहतूक नियंत्रकाला दोन विमान वाहतूकीदरम्यान नियंत्रण करण्यासाठी फक्त काही सेकंदाचा वेळ मिळतो.
यापूर्वी मुंबई विमानतळावर ९८० विमानांची वाहतूक २४ तासांमध्ये झाली होती. तोही एक विक्रमच होता. त्यापूर्वी ८३७ विमान उड्डाणाचा विक्रम होता. लंडनच्या गैटविक विमानतळाने ८०० विमानाची वाहतूक २४ तासात करण्याचा विक्रम केलाहोता. हे विमानतळ दिवसातून १९ तासांसाठी खुले असते. मुंबई विमानतळ मात्र दिवसरात्र २४ तासही सुरू असते.