बारामती । भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण फारच थाटामाटात नुकतेच साजरे झाले. मात्र मिलमधील घोटाळ्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून नवीन विस्तारीकरण कारखाना बंद आहे. नवीन कारखान्याच्या विस्तारीकरणातील मिलचा पट्टा काही प्रमाणात ऊस बाहेर फेकत होता. त्यामुळे कारखाना बंद असावा, असा बांधला जात होता. सहा दिवसानंतर त्याची दुरुस्ती झाली. परंतु सभासदांचा ऊस तोडीत जात नसल्यामुळे काही सभासदांनी याबाबतची माहिती घेतली. त्यामुळे कारखाना बंद झाल्याचे कारण समोर आले.
फक्त 500 टन क्षमतेने गाळप
गाळप क्षमता वाढल्यामुळे आपला ऊस लवकर जाईल व त्यामुळे दुसरे एखादे पिक हातात येईल, अशी अपेक्षा सभासदांनी होती. मात्र विस्तारीकरणानंतर कारखाना सहा दिवस बंद राहील्यामुळे सभासद संतप्त झाले आहेत. मिलमधील दुरुस्ती झाल्यानंतर कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालेल अशीही सभासदांची अपेक्षा होती. मात्र, कारखाना दररोज 500 टन क्षमतेने चालत आहे. वास्तविक पाहता कारखान्याची क्षमता प्रतिदिनी साडेतीन हजार टन क्षमतेची आहे. कारखान्याच्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या आपेक्षेने कारखान्याचे काम चांगल्या दर्जाचे होईल, अशी अपेक्षा केली होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरल्याचे लक्षात येत आहे.
खासगू कारखान्यांना ऊस
या कारखान्याच्या गाळप हंगाम समारंभात शरद पवार व अजित पवार यांनी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व परिसरातील शेतकर्यांचे एक टिपरुही इतर कारखान्यांना जाऊ देणार नाही, अशी गर्जना सभासद शेतकर्यांसमोर केली. मात्र प्रत्यक्षात उलटेच घडत आहे. कारखान्याच्या क्षेत्रातील आतापर्यंत जवळपास दिड लाख टनाच्यावर ऊस खासगी साखर कारखान्यांस गेला आहे. या कार्यक्षेत्रातून ऊस दररोज खुलेआम मोठ्या प्रमाणात खासगी साखर कारखान्यांना जात आहे.
पैशांची उधळपट्टी
हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत तसेच ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे. ठेकेदार कंपनी व कारखान्यातील अधिकारी वर्ग यांच्यात चांगलाच समन्वय तयार व्हावा, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली आहे. नवीन कारखान्याच्या पहिल्याच गाळप हंगामात सदोषता निर्माण झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये शंका तयार झाल्या आहेत. कारखान्याच्या गाळप हंगाम कार्यक्रमाच्या शुभारंभास 20 लाखापेक्षा जास्त खर्च केल्याचे बोलले जात आहे. या झगमगाटावर शेतकरी नाराज आहेत.
शेतकरी संभ्रमात
बारामती तालुक्यातील एका खासगी साखर कारखान्याचे मालक सध्या बारामती तालुक्यातील गावागावातून ऊसासाठी फिरताना दिसताहेत. राजकीय प्रभावाचा पूर्ण वापर करून आमच्याच कारखान्यांना ऊस घाला, अशा स्वरूपाचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे व दबावाचे वातावरण आहे. वजनमापातील घोटाळ्यामुळे शेतकरी या खासगी साखर कारखान्यास ऊस द्यावयास धजावत नाहीत. एका शेतकर्याने बोलताना सांगितले की, आमच्यावर खूप दबाव वाढत आहे. राजकीय परिस्थितीमुळे आम्ही गप्प आहोत. खासगी साखर कारखान्यांना ऊस देण्याची अजिबात तयारी नाही. भवानीनगर कारखाना सतत बंद पाडण्यास खासगी साखर कारखान्याचे राजकीय संबंधित लोक जबाबदार असावेत, असा आमचा संशय आहे. कारखाना कार्यक्षमतेने चालू द्यायचा नाही. असा एकीकडे प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.