नाशिक: जवानांची व्यथा मांडणार्या देवळाली कॅम्पमधील बेपत्ता जवान रॉय मॅथ्यू या 33 वर्षीय जवानाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात असले तरी मृत्यू प्रकरणात संशय बळावला आहे.
‘वरिष्ठ अधिकार्यांच्या मुलांना शाळेत सोडणे आणि त्यांचे पाळीव श्वान फिरवणे’ अशी सहाय्यकाची कामे करावी लागत असल्याचे सांगणारा व्हिडिओ त्याने व्हायरल केला होता. रॉय हा 25 फेब्रुवारी पासून बेपत्ता होता, अखेर काल देवळाली कॅन्टॉनमेंटमधील एका खोलीत रॉयचा गळफास घेतलेला, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केली जाईल, असे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले.
ब्रिटीश राजवटीप्रमाणे दिली जातेय वागणूक
रॉय मॅथ्यूचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय मॅथ्यू गेल्या 13 वर्षांपासून लष्करात कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पमधील जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जवान वरिष्ठांच्या मुलांना शाळेत सोडणे-आणणे, तसेच त्यांची कुत्री फिरवणे अशी सहाय्यकाची कामे करताना दिसत होते, या स्टिंग ऑपरेशनमुळे मोठा वादही निर्माण झाला. ब्रिटीशांच्या राजवटीतीप्रमाणे जवानांना सहाय्यकाची वागणूक देण्यात येत असल्याची टीकाही लष्करातील अधिकार्यांवर करण्यात आली होती.
मॅथ्यूची चौकशी करण्यात येत होती
याप्रकरणानंतर इतर जवानांसह मॅथ्यूचीही चौकशी करण्यात येत होती. मात्र 25 फेब्रुवारीपासून तो अचानक गायब झाला आणि अनेक दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मात्र गुरुवारी संध्याकाळी कॅम्पमधील एका निर्जन भागातील खोलीत त्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्यान एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत असून, रॉय मॅथ्यूचा कोणी छळ केला होता का, चौकशी प्रकरणामुळे तो दबावाखाली होता का हेही तपासण्यात येत आहे.