छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांपी खंडणी मागितली

0

शिव व्यापारी सेनेचा आरोप

वाकड : छावा संघटनेचे कार्यकर्ते व तथाकथित स्वयंघोषित पुढारी पिंपरी-चिंचवड शहरातील गॅस शेगडी दुरुस्त करणार्‍या दुकानदारांकडे वेळोवेळी खंडणीची मागणी करतात. तसेच दुकानदारांनी खंडणी देण्यास नकार दिल्यास अन्न पुरवठा प्रशासनाला बोलावले जाते. पोलिसांना सांगून दुकानातून गैरव्यवहार चालत असल्याच्या खोट्या तक्रारी दिल्या जातात असे आरोप शिव व्यापारी सेनेच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे कष्ट करून पोट भरणार्‍या दुकानदारांना न्याय देण्यासाठी अशा मुजोर कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्यावतीने वाकड पोलिसांना निवेदन देण्यात आले.

अन्न पुरवठा प्रशासनाला खोटी कागदपत्रे
शिव व्यापारी सेनेच्यावतीने वाकड पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून छावा संघटना पिंपरी-चिंचवड शहरातील गॅस शेगडी दुरुस्त करणार्‍या लहान दुकानदारांना खोट्या तक्रारी देण्याची धमकी देऊन दुकानदारांकडून खंडणी वसूल करण्याचे काम करतात. एखाद्या दुकानदाराने खंडणी देण्याचे अमान्य केल्यास अन्न पुरवठा प्रशासनाला खोटी पत्रे व फोन करून त्यांना बोलावले जाते. बुधवारी छावा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल वीर व अन्य दोन साथीदारांनी तापकीरनगर चौकातील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या माउली गॅस शेगडी दुरुस्ती व विक्री करणार्‍या दुकानदाराला कोणत्याही कारणाशिवाय पैसे मागितले. एखादा अधिकारी एखाद्या दुकानावर कारवाई करण्यासाठी जात असताना सोबत संबंधित विभागाचे अधिकारी व पोलिस असायला हवे. मात्र अमोल वीर याने असे काहीही न करता मी अधिकारी असून तुमच्या दुकानावर कारवाई करण्यासाठी आलो आहे, असे सांगून दुकानदाराला घाबरवले. दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. खंडणी देण्यास दुकानदाराने नकार दिला, म्हणून वीर याने पोलिस व अन्न धान्य पुरवठा विभागाला माऊली गॅस दुरुस्ती व विक्री या दुकानाची झडती घेण्यास भाग पाडले. दुकानात काहीही न आढळल्याचे दिसताच अमोल वीर व त्याच्या दोन साथीदारांनी तिथून पळ काढला. पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांना विनाकारण खंडणी मागणे, वेगवेगळ्या उत्सवांची जबरदस्तीने वर्गणी मागणे असे प्रकार होत असतील तर अशा व्यापारी व नागरिकांनी युवराज दाखले यांच्याशी 9922373959 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन शिव व्यापारी सेनेच्यावतीने करण्यात आले आहे.