छिंदमच्या वकीलपत्राची अफवा,नगरमधील वकिलाला मनस्ताप

0

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा भाजपचा पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदमचे वकिलपत्र घेतल्याची अफवा पसरल्याने एका वकिलाला मनस्ताप सहन करावा लागला. अ‍ॅड. सुरेश सोरटे यांच्या मोबाईल क्रमांकासह सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने ते त्रस्त झाले. त्यांना फोनवरून शिवीगाळ, धमक्यांचा मनस्ताप सहन करावा लागला.

अ‍ॅड. सोरटे यांना पोलिस संरक्षण
या प्रकरणी अ‍ॅड. सुरेश सोरटे यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांना निवेदन दिले असून, खोटी पोस्ट पसरणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहेत. त्यामुळे मी छिंदमचे वकीलपत्र घेतले नाही आणि घेणारही नाही, असे सोरटे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने त्वरित दखल घेऊन, सोरटे यांना शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे.

पुण्यातूनही धमकीचे फोन
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणार्‍या आणि भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव बार असोसिएशनने केला आहे. मात्र सोरटे यांनी छिंदमचे वकीलपत्र घेतल्याची खोटी पोस्ट व्हायरल झाल्याने सोरटेंकडे विचारणा होऊ लागली. रविवारी सकाळपासून सोरटेंना मोबाईलवरुन शिवीगाळ आणि दमबाजी केली जात आहे. अहमदनगरसह सातारा, नाशिक, पुण्यातून धमकीचे फोन आले.

छिंदमचा राजीनामा मंजूर
श्रीपाद छिंदम याचा उपमहापौरपदाचा राजीनामा अहमदनगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणार्‍या छिंदम याला यापूर्वीच भाजपमधून बडतर्फ करण्यात आले आहे. उपमहापौरपदानंतर त्याचे नगरसेवक पदही रद्द करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. स्थायी समितीने महापौर कदम यांना पत्र लिहून याप्रकरणी विशेष महासभा बोलावण्याची मागणी केली आहे.