छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरुच

0

चाकण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत दारू विक्रीला बंदी घालण्यात आल्याने कायदेशीर बिअरबारमधील दारू विक्री एक एप्रिलपासून बंद झाली खरी, मात्र छुप्या अवैध पद्धतीने दारू विक्रीचा काळा धंदा जोरात सुरू झाला आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण व आळंदी या शहरासह आजूबाजूच्या परिसरात असणारे देशी-विदेशी दारू विक्री केंद्रे बंद झाल्याने छुप्या मार्गाने अव्वाच्या सव्वा भावाने दारू विक्री सुरू असल्याने दारू बंदीचा फटका तळीरामांना बसलाच नसल्याचे समोर येत आहे.

महिला वर्गात दारूबंदी झाल्याने समाधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने दारू विक्रीची भरघोस कमाई ठप्प झाली आहे. महिला वर्गात दारूबंदी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील शेकडो दारूविक्रीची बंद झाली आहे. एका आर्थिक वर्षात करोडो रूपयांचा महसूल मिळत असतो. तसेच बिअर शॉपीचे परवाने सहज मिळू लागल्याने महामार्गासह ग्रामीण भागात अशा शॉपींच्या संख्या अधिक वाढली. यातून महसूल वाढला खरा मात्र अपघातांची संख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून 500 मीटरच्या आत असलेली सर्वच मद्यविक्रीच्या दुकानांना, बिअरबार परमिट रूम हॉटेललांना बंदी घालण्यात आली आहे. एक एप्रिलपासून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक देशी विदेशी दारूविक्रीचा धंदा करणार्‍या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

गावठी दारूचा धंदाही जोरात
ग्रामीण भागातील छोटी मोठी हॉटेल, पानटपर्‍या व ढाब्यांवर सर्रास देशी विदेशी दारू विक्री होत असल्याचे अनेक तळीराम सांगत आहेत. गावठी दारूचा धंदाही जोरात सुरू आहेत. औद्योगिक भागासह शहरी व ग्रामीण परिसरातही देशी-विदेशी दारू विक्रीचे अड्डे पावलोपावली आहेत. यातील सर्वच ठिकाणावरील दारूविक्री बंद आहे. परंतु अनेकांनी छुप्या मार्गाने दारूविक्री करून लाखो रुपयांची माया गोळा करायला सुरुवात केली आहे. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी ढाब्यांवर पहिल्यापासूनच स्थानिक पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या वरदहस्ताने अवैध मार्गाने दारूविक्री सुरू होती. अशा ठिकाणीवरील दारू चढ्या भावाने विकली जात आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील मोजक्याच परमिट रूम व बिअरबार हॉटेलांमध्ये दारूविक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याठिकाणीही चढ्या किंमतीत दारू मिळत आहे. तरीही दारूबाजांनी कुठलेही आढेवेढे न घेता मागणी होईल ती रक्कम मोजून दारू खरेदी केली जाते.

गावठी दारूवर कायमची बंदी घाला
अवैध मार्गाने होणारी दारूविक्री बंद करण्याची ही मागणी अनेक महिलांनी केली आहे. दारूबंदीने अनेकांचे संसार धुळीस मिळाल्याची उदाहरणे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निदान रोज दारू पिणारांचे प्रमाण कमी होईल. न्यायालयाने गावठी दारू विक्रीवरही कायम बंदी घालण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांनी अनेक वर्षांपासून केली आहे. महामार्गावरील दारूविक्री सध्या तरी बंद आहे. भविष्यात या बंदीची अवस्था गुटखाबंदी सारखीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी कडक अंमलबजावणी होत असल्याचे चित्र असले तरी परवानाधारक दुकाने महामार्गासोडून सुरू झाल्यावर बिगरपरवानाधारक ढाबे व हॉटेलांवरही खुलेपणाने दारूविक्री सुरू होण्याची शक्यता आहे.