छेडखानींना बसणार आळा : भुसावळातील शाळा-महाविद्यालयांबाहेर आता पोलिसांसह होमगार्डचा पहारा

भुसावळ : शहरातील शाळा-महाविद्यांलयाबाहेर रोडरोमिओंचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाकडे वाढल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ही बाब गांभीर्याने घेत स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे. शाळा व महाविद्यालय भरण्याच्या वेळेस व सुटल्यानंतर अचानक भरारी पथक जावून रोडरोमिओंना कायद्याने धडा शिकवणार आहे. सोमवार, 11 रोजी शहरातील दोन महाविद्यालयांसह एका शाळेबाहेर पोलिसांनी नाकाबंदी लावल्याने टारगटांनी पोलिसांना पाहताच धूम ठोकली. यावेळी विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना पोलिसांनी समज दिली. दोन दिवसात कागदपत्रे व नियमानुसार वाहतूक होताना आढळून न आल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला.

टारगट रोडरोमिओंची जागेवर होणार धुलाई
शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात मात्र सडकछाप रोडरोमिओ विद्यार्थिनी येण्या-जाण्याच्या रस्त्यावर तसेच शाळा-महाविद्यालय परीसरात ठाण मांडून असल्याने विद्यार्थिनींना मोठा मनस्ताप सोसावा लागतो. या पार्श्वभूमीवर अनेक सुज्ञ पालकांसह शिक्षकांनी पोलिस उपअधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर उपअधीक्षक वाघचौरे यांनी ही बाब गांभीर्याने घेत स्वतंत्र पथकाची निर्मिती करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

पहिल्या दिवशी शाळा परीसरात नाकाबंदी
भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक तसेच शहर वाहतूक शाखेच्या नऊ कर्मचार्‍यांसह 12 कर्मचार्‍यांनी शहरातील तापी नगरातील के.नारखेडे विद्यालय, पु.ओ.नाहाटा महाविद्यालय तसेच प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या परीसरात सोमवारी सकाळी व दुपारी नाकाबंदी लावली. यावेळी विनाकारण शाळा परीसरात वावरणार्‍यांना हटकण्यात आले व कागदपत्रे नसलेल्यांवर मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली तर पोलिसांना पाहताच टारगटांनी काढता पाय घेतला.

विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई
विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना प्रसंगी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले तर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवल्यास तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यास दोन दिवसानंतर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. शहर वाहतूक शाखेने प्रसंगी विना क्रमांकासह वाहतूक नियम मोडणार्‍या दहा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी दिली.

शाळा परीसरात नियमित गस्त : पोलिस उपअधीखक
शाळा परीसरात पोलिसांची नियमित पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रीक्षांवर कारवाईचे आदेश शहर वाहतूक शाखेला देण्यात आले आहे. शहरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांची बैठक घेवून शालेय व्यवस्थापन समितीतील पदाधिकार्‍यांचा सोशल ग्रुप तयार करण्यात आला आहे. ग्रुपवर तक्रार आल्यानंतर लागलीच पोलिसांचे वाहन पाठवून तक्रारी सोडवल्या जातील. शाळेच्या मुख्याध्यापकांसह प्राचार्य व शिक्षकांनीदेखील काही तक्रारी असल्यास आपल्याशी संपर्क साधल्यास लागलीच मदत पाठवली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.