छेडखानीचा जाब विचारल्याने मुलीसह आईला दगडाने मारहाण ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यावर मुलीसह तिच्या आईलाच दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील भारत नगरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील भारत नगरात प्रौढ महिला या मुलीसह वास्तव्यास आहे. भारत नगरातच राहणार्‍या काही तरुणांनी महिलेच्या मुलीची छेड काढली होती. बुधवार, 16 मार्च रोजी महिलेने याबाबत जाब विचारला असता तरूणांनी घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीला दगडाने मारहाण करून दुखापत केली तर इतरही दोन ते तीन जणांनी मारहाण केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मोहन भालेराव, राजू भालेराव यशवंत भालेराव, बळवंत भालेराव, समाधान भालेराव (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा.भारतनगर) या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.