रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता ; अनर्थ टळला ; दोन गाड्या धावल्या विलंबाने
भुसावळ- उत्तरप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या व अंधेरीत चालक म्हणून असलेल्या मनोविकृत ईसमाने भुसावळ रेल्वे स्थानकावरील अप लाईनवर उभ्या असलेल्या पेट्रोल टँकरवर उभे राहून थेट 25 हजार प्रवाह असलेल्या ओएचई वायरला हात लावून आत्महत्या करण्याचा प्रकार केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने रेल्वे अधिकार्यांसह सुरक्षा यंत्रणेने खळबळ उडाली. अप्रिय घटना घडण्यापूर्वीच वीज प्रवाह खंडित करून मनोविकृत इसमास खाली उतरण्यात आले. संतोषकुमार कन्हैय्यालाल राजभर (वय 28, रा. आजमगड, उत्तर प्रदेश, ह.मु.अंधेरी, मुंबई) या इसमाविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची दोन हजार रुपयांचा दंड भरल्यानंतर सुटका केली.
मनोविकृताच्या कृतीने उडाला थरकाप
समजलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार कन्हैय्यालाल राजभर (वय 28, रा. आजमगड, उत्तर प्रदेश, ह.मु.अंधेरी, मुंबई) या इसमाला गावी जावयाचे असल्याने तो कालपासून रेल्वे स्थानकावर आला होता मात्र कुणीतरी आपल्याला मारण्यासाठी येत असल्याचे सांगून तो अप लाईनीवर पेट्रोल टँकर असलेल्या मालगाडीवरच चढून ओव्हर हेड वायरिंगच्या 25 हजार होल्ट असलेल्या वाहिनीला हात लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक एस.एस.शहा, शेख नावेद, एम.अल्डोस यांनी त्यास शिताफीने खाली उतरवत रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणल्यानंतर त्याची विचारपूस केली मात्र संबंधिताने हे कृत्य नेमके का केले? याबाबत ठोस माहिती न दिल्याने त्याच्याविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकारामुळे प्लॅटफार्म क्रमांक तीनजवळ रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती तर वर्धा पॅसेंजरसह 12142 पटना-मुंबई पॅसेंजरलाही 10 ते 15 मिनिटे खोळंबा झाला.