जकात नाक्यांचा वापर कोस्टल रोडच्या कास्टिंग यार्डसाठी होणार

0

मुंबई । मुंबईतील जकात कर बंद झाल्यानंतर कर वसूल करणारे जकात नाकेही आता ओस पडू लागले आहेत. परंतु, आता सर्व जकात नाक्यांच्या जागांचा वापर मुंबई सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड)च्या कास्टिंग यार्डसाठी केला जाणार आहे. जकात नाक्यांच्या जागांवर सागरी किनारा रस्त्याच्या कास्टिंग यार्डसाठी केला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी केली. वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेतर्फे होणारा जकात कर रद्द झाला आहे. त्यामुळे जकात कराची वसुली करणार्‍या नाक्यांच्या जमिनी ओस पडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी आरटीओचे कार्यालय तसेच खासगी वाहनांसाठी आगार बनवण्याची मागणी होत असतानाच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या जागेचा वापर मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी कास्टींग यार्डकरता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आयुक्तांनी ऑक्टोबर 2017 मध्ये मंजुरी दिली होती.

संरक्षण भिंतीचा प्रस्ताव घेतला मागेे
मुंबईतील सर्वच जकातनाक्यांभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. पण अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी ही जागा कोस्टल रोडच्या कास्टिंग यार्डसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगत संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव मागे घेतला.

90 हेक्टरवर भरणी
दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकला जोडणारा 09.98 किलोमीटरचा हा सागरी मार्गाचा पहिला टप्पा असून या मार्गावर प्रत्येकी 3.45 किलोमीटरचे दोन बोगदे उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच 90 हेक्टरवर भरणी करण्यात येऊन हा संपूर्ण परिसर हरित पट्टा राखण्यात येणार आहे. या सागरी मार्गावर सायकल ट्रॅक, उद्यान, मल्टिस्टोअर कार पार्किंग तसेच बीआरटीएस बस डेपोची उभारणी करण्यात येणार आहे.