जगज्जेता ब्लँका बोट्सचा आता रशियातही वाजणार डंका

0

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीचा संघ रवाना ; 24 ते 28 ऑक्टोबदरम्यान रोबोटिक्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा

भुसावळ- आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भुसावळातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ब्लँका बोट्सचा संघ चीनमधील स्पर्धेत जगज्जेता ठरला होता. आता हा संघ रशियात रवाना झाला असून ‘द युनियन ऑफ यंग प्रोफेशनल्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत भरवल्या जाणार्‍या ’हायटेक 2018’ या स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे. रशियामधील एकाटीनबर्ग येथे 24 ते 28 ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा होणार असून त्यासाठी टीम ब्लँका बोट्स 22 ऑक्टोबरला दुबई मार्गे रशियाला रवाना झाली. या संघात संघ प्रमुख अक्षय जोशी, प्रफुल्ल चौधरी, राहुल न्हावकर, रोहित वारके, गिरीश नंदनवार व ऋषिकेश बडगुजर यांचा समावेश आहे. हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, डी.प्रा.डॉ.आर.बी.बारजीभे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेसाठी दोन नवीन रोबोटची निर्मिती
110 किलो वजनी गटाच्या कॉम्बॅट रोबोटिक्स स्पर्धेत टीम ब्लँका बोट्स सहभागी होईल. या स्पर्धेसाठी संघाने ‘धनाजी गामा 2.0’ आणि ‘तानाजी’ या दोन रोबोटची महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत केली आहे. यापूर्वी ब्लँकाची निर्मिती असलेल्या खाशाबा, बाजीप्रभु, संभाजी, दारा या रोबोट्सने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केला आहे. प्रा.एन.एम.खंडारे, प्रा.जी.सी.जाधव, प्रा.जे.एस.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर विश्वास
संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या मल्टि डिसिप्लिनरी सेलद्वारा ब्लँका बोट्स संघाला पुरेपूर तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य दिले जाते. विद्यार्थी देखील त्याचा पूर्णपणे उपयोग करत आपले प्रदर्शन सातत्याने सुधारत आहेत, असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले. तर नवीन रोबोट्सच्या तांत्रिक कामगिरीची उत्सुकता असून विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी व मेहनत घेण्याची तयारी यावर आम्हाला प्रचंड विश्वास आहे, विभागप्रमुख प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.