जगताप, लांडगे, भेगडे होणार का मंत्री?

0

साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार एप्रिलमध्य
महापालिकेत सत्ता आणली किंवा मावळात भाजप मजबूत केला हेच असतील निकष

पिंपरी-चिंचवड : गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात पिंपरी-चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप की सहयोगी आमदार महेश लांडगे या दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर, ऐनवेळी मावळचे आमदार बाळा भेगडे यांना मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागणार का? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

शहरासह मावळात उत्सुकता
भाजप-शिवसेना सरकारला साडेतीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या अगोदर मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेकदा वावड्या उठल्या होत्या. परंतु, प्रत्येकवेळी कोणत्यातरी कारणावरून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत होता. आता बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार एप्रिल महिन्यात होणार आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार अखेरचा असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पिंपरी-चिंचवड शहरातून कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक विस्तारावेळी केवळ चर्चाच
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास शहराला ’लाल’ दिवा जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ज्या आमदाराचे जास्त समर्थक नगरसेवक निवडून येतील त्या आमदाराला मंत्रिपद दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. महापालिका निवडणुकीत भाजपला अनपेक्षित बहुमत मिळाले. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आमदारांच्या सहाय्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला उध्वस्त केला. पालिकेत सत्ता आणल्यानंतर आमदार जोडगोळीला मंत्रिपदाचे वेध लागले होते. जगताप आणि लांडगे यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याचेच जास्त समर्थक नगरसेवक निवडून आल्याचे दावे करायला सुरुवात केली होती. त्यानंतर प्रत्येकवेळी मंत्रिमंडळ विस्ताराची वार्ता आली की शहरातून आमदार जगताप की लांडगे यांची वर्णी लागणार याच्या चर्चा झडत होत्या. पंरतु, दरवेळी मंत्रिमंडळ विस्तार मागे पडत होता.

भेगडे स्ट्राँग, पण जगताप ठाम
एप्रिल महिन्यात अखेरच्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागावी यासाठी जगताप, लांडगे आणि भेगडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार जगताप व लांडगे या दोघांपैकी एकाची मंत्रिमंडळात हमखास वर्णी लागणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. या दोघांमध्ये मंत्रिपदावरून एकमत न झाल्यास भेगडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत जगताप यांना मंत्रिमंडळाविषयी विचारले असता शहरातील आमदाराला मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच ही संधी शेवटच्या चार महिन्यात सुद्धा मिळू शकते, असेही ते म्हणाले होते.