जगन सोनवणेंसह दहा जणांची निर्दोष सुटका

0

भुसावळ- नगरसेवक पदावरून अपात्र केल्याच्या संशयावरून 2013 मध्ये तत्कालीन पालकमंत्री आमदार संजय सावकारे यांचा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पुतळा जाळल्याचा आरोप पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्यासह त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर होता. बाजारपेठचे तत्कालीन निरीक्षक प्रभाकर रायते यांनी या प्रकरणी पोलिसात सोनवणे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाध्यक्ष राजू डोंगरदिवे, पीआरपी शहराध्यक्ष राजेश मोरे, पीआरपी तालुकाध्यक्ष अरुण नरवाडे, छत्रपती सेना अध्यक्ष दीपक निकम, राष्ट्रीय चालक-मालक सेना अध्यक्ष दीपक सोनवणे उर्फ डाबर्‍या, राष्ट्रीय हॉकर्स सेनेचे तालुकाध्यक्ष सम्राट बनसोडे, दलित मुक्ती सेना जिल्हाध्यक्ष व कन्हाळा उपसरपंच सुधीर जोहरे, दीपनगरचे ग्रामपंचायत सदस्य हरीष सुरवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तब्बल पाच वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. संशयीतांविरुद्ध कुठलाही पुरावा न आढळल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. निकालानंतर सोनवणे समर्थकांनी न्यायालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली. सोनवणे यांच्यातर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे, अ‍ॅड.स्वाती कापडे यांनी काम पाहिले.