जगाला कुशल शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ बरोबरच मूल्याधिष्ठीत नागरीकांचीही गरज-डॉ. सोमनाथ वडनेरे

0

जळगाव –  विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, अभियांत्रिकी, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी-न्याय आणि इतर क्षेत्रात लागणा­या कुशल मनुष्यबळाबरोबर जगाला मूल्याधिष्ठीत नागरीकांचीही तितकीच आवश्यकता आहे आणि आजची शिक्षणप्रणाली त्यासाठी तोकडी ठरत आहे असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युआयसीटीमध्ये आयोजित व्याख्यानात केले.

अखिल भारतीय तंत्र परिषदेच्या (एआयसीटीई) माध्यमातून देशातील प्रत्येक विद्यापीठात प्रेरण कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्याअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या यु.आय.सी.टी.मध्ये इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत मूल्याशिक्षण आणि मानविय मूल्यांचे महत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी या प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत संवाद साधला.

आपल्या संबोधनात डॉ. वडनेरे पुढे म्हणाले की विज्ञानाच्या अनेक शाखांच्या विकासाबरोबर भौतिक संसाधनाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन सुकर झाले आहे. मात्र या प्रगतीच्या, स्पर्धेच्या भाऊगर्दीत मूल्यांची हेळसांड होतांना दिसते. प्रत्येक क्षेत्रात वेगाने मूल्यांचा होणारा ­हास चिंता वाढविणारा असाच आहे. शिक्षण पध्दतीत पून्हा मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठीचे प्रयत्न सर्वच क्षेत्रातून होणे आवश्यक आहे. यासाठी अखिल भारतीय तंत्र परिषद (एआयसीटीई) यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठांमध्ये असे प्रेरण कार्यक्रम राबविणे स्तुत्य असेच आहे. मूल्यांच्या संवर्धनासाठी सर्वप्रथम शिक्षकांनी पुढाकार घेतल्यास शाश्वत मानवीय मूल्यांचे संवर्धन करणे शक्य होईल असेही त्यांनी सांगितले.

जीवनात यशस्वीतेसाठी सोळा शक्तिंची आवश्यकता

डॉ. विशाखा गर्गे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात आणि करीयर मध्ये यशस्वीतेसाठी काही आवश्यक बाबी सांगितल्यात. त्यात विविध सोळा शक्तिंचा समावेश होता. एैकूण घेणे, सहन करणे, स्विकार्हय वृत्ती, आत्मविश्वास आदि बाबींवर त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.

विद्यापीठ रासायनिक तंत्रज्ञान संस्थेत विविध प्रेरण कार्यक्रमांचे आयोजन आयोजित करण्यात आले. विविध वक्त्यांनी या अंतर्गत मार्गदर्शन केले. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.निमसे, डॉ. पाऊलकर, डॉ. भारती तसेच विद्यापीठातील डॉ. रोकडे, प्रा. पत्की, प्रा. डोंगरे, डॉ. परदेशी, डॉ. वडनेरे आणि प्रा. नितीन बारी, डॉ. विशाखा गर्गे आदिंचा समावेश होता. प्रेरण उपक्रमाचे समन्वयन युआयसीटीईचे संचालक प्रा.जे.बी.नाईक, डॉ. रविंद्र पुरी, डॉ. राजकुमार सिरसाम यांनी केले.