नवी दिल्ली: जुनी वस्तू, सामान यांची खरेदी, विक्रीसाठी ओएलएक्स (OLX) ही वेबसाईट प्रसिध्द असून या साईटचा फायदा घेत एका तरुणाला चोरांनी गंडा घातल्याची घटना घडली आहे. आपली जुनी बाईक विकण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला फसवून त्याची बाईक घेऊन चोरांनी पळ काढलाच शिवाय कॉल करण्याचा बहाणा करीत त्याचा मोबाईलही घेऊन पसार झाले. त्यामुळे अशा वेबसाईट्सवर अनेकदा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना व सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. फसवणूक झालेल्या तरुणाने गोकलपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून कायदेशीर सल्ला घेत पोलिसांनी विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला.
असा घडला प्रकार
नेहरु विहार येथे राहणारा मोहम्मद सुहैल (17) याने 15 दिवसांपुर्वी आपली यमाहा आर-15 बाईक विकण्यासाठी वेबसाईटवर जाहिरात दिली होती. 22 जून रोजी एका तरुणाने बाईक विकत घेण्यासाठी त्याला फोन केला होता. सुहैलने 55 हजार किंमत सांगितली असता, समोरील व्यक्तीने 48 हजारात सौदा केला. कॉलरने शुक्रवारी सकाळी सहा वाजता सुहैलला वजीराबाद रोडवर बोलावले व टेस्ट ड्राईव्ह करायचं असल्याचं सांगत एकने सुहैलकडून बाईकची चावी घेतली तर अन्य एकाने पैसे मागवायचे असून आपल्या मोबाईलवरुन फोन लागत नाही सांगत दुसर्याने सुहैलचा मोबाईल घेतला. मोबाईलवर बोलत बोलत तो पुढे चालत गेला जिथे दुसरा तरुण बाईक चालू करुन उभा होता. तिथून दोघांनीही बाईकवरुन पळ काढला.