जनताच सरकारला जागा दाखवेल : खा. सुळे

0

फुरसुंगी । वारंवार होणारी गॅस व पेट्रोल-डिझेल दरवाढ, राज्यातील रस्त्यांची झालेली चाळण, शेतकर्‍यांना देण्यात येणारी फसवी कर्जमाफी, नोटबंदी, जीएसटीमुळे वाढलेली महागाई, घोटाळेबाज मंत्र्यांना दिले जाणांरे अभय यांसारख्या धोरणांमुळे राज्यातील सर्वसामान्य जनता अक्षरक्ष: मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे आगामी 2019च्या निवडणुकीत केंद्रात व राज्यात सध्याच्या सरकारला ही जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

उरुळी-फुरसुंगीचा कचराडेपो हलवा
उरुळी देवाची व फुरसुंगीचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात आल्याने आता महापालिका प्रशासनाने येथील कचराडेपो पूर्णत: बंद करून हा कचराडेपो इतरत्र हलवावा. या कचराडेपोमुळे उरुळी-फुरसुंगीकरांनी 20 वर्षे नरकयातना भोगल्या आहेत. त्यामुळे प्रशासनानेही त्यांच्याही सहनशक्तीचा अंत पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

रस्त्यावरच चूल मांडून निषेध
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था व केंद्र सरकारने केलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात खा. सुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हडपसर-सासवड मार्गावर मंतरवाडी चौकात शुक्रवारी तीनला आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने सुमारे 10 मिनिटे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ खा. सुळे व राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी याप्रसंगी रस्त्यातच चुलीवर भाकरी भाजून सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जि.प.अध्यक्ष प्रदीप कंद, जि.प.सदस्य अर्चना कामठे, रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे, नगरसेवक चेतन तुपे, अजिंक्य घुले, पं.स.सदस्य रोहिनी राऊत, सचिन घुले, भगवान भाडळे, नंदू काळभोर, सुहास खुटवड उपस्थित होते.

राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष
याप्रसंगी खासदार सुळे म्हणाल्या की, राज्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत आहे. राज्यातील सध्याच्या रस्ता दुरवस्थेबाबत रस्त्यावर उतरणारा राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे. यावेळी सुळे यांनी रस्त्याने जाणार्‍या एसटीतील प्रवाशी व चालकांशी संवाद साधून त्यांच्याही समस्या दूर करण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. जालिंदर कामठे व प्रदीप कंद, चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनासाठी पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला आंदोलनकर्त्यांची संख्याही लक्षणीय होती.