जनतेची दिवाळी गोड नाहीच : दहा दिवसात शिधा पोहचणे अशक्य

उज्वल स्पर्श भाग 2 : ठेकेदारांची दिवाळी, जनतेच्या पैशांची होळी

प्रफुल्ल साळुंखे

मुंबई : जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाने साखर , रवा, चणाडाळ, पामतेल देण्याचं जाहीर केले आहे . केवळ दहा दिवसात हा शिधा सामान्य जनतेला पोहचणे अशक्य आहे. म्हणजेच दिवाळी केवळ निमित्त होते, 517 कोटींचा मलिदा हे उद्दिष्ट होते हे आता स्पष्ट झालं आहे. यावरून ठेकेदारांची दिवाळी … जनतेच्या पैशाची होळी हे निश्चित आहे.

आठ दिवसात शिधा पोहोचवणे अशक्य
शासनाने दिवाळीला शिधा वाटप देण्याचे जाहीर केले. 10 दिवसात एक कोटी त्रेसष्ट लाख लाभार्थ्यांना पासष्ट हजार मेट्रिक टन शिधा खरेदी करावी लागणार आहे, जी आज महाराष्ट्रात कुणाकडे उपलब्ध नाही. एवढा शिधा आणण्यासाठी आग्रा, मध्यप्रदेश आणि दिल्ली येथून माल आणावा लागेल. म्हणजेच शिधा येण्यास किमान आठवडा जाईल. आलेला माल राज्यातील 717 गोडावूनपर्यंत पोहचवायचा आहे. गोडावून किपर कच्चा मालाचे पाउच एका पिशवीमध्ये भरतील आणि ते जिल्हा तालुका आणि गाव स्तरावरील धान्य दुकानात पोहचवतील. लाखो दुकानात ते पोहचवणे हे आठ दिवसात अशक्य आहे.

पॅकिंग नसल्याने ठेकेदाराचा नफा सत्तर कोटींच्या पुढे?
टेंडरमध्ये डाळ, पामतेल, रवा आणि सांखर प्रत्येक गोष्टी स्वतंत्रपणे शासनाच्या छपाई असलेल्या पाउचमध्ये द्यायच्या आहेत. म्हणजे टेंडरमध्ये नोंद केलेल्या वस्तूंची गुणवत्ता, पॅकिंग तारीख, पॅकिंग कुठे केली हे सर्व छापावे लागणार होते, पण आता ही अटच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता टेंडरमध्ये नमूद केलेल्या उत्तम वस्तूंऐवजी निकृष्ट मालाचा पुरवठा होण्याची शक्यताच अधिक आहे. म्हणजेच या वस्तूंच्या किंमती अजून कमी होऊन नफा कमीत-कमी सत्तर कोटींच्याही पुढे जाईल.

नफा ठेकेदाराचा … दोष शासनावर
कंन्झुमर फेडरेशनने हा ठेका घेतल पण फेडरेशनकडे खरेदी आणि वस्तू वितरीत करणारी यंत्रणाच नाही. मग हा ठेका एका ‘विवेकी उज्ज्वल ’ व्यक्तीला देण्यात आला. एव्हढा मोठा ठेका एकालाच दिल्याने गाजावाजा झाला. मग हा ठेका पाच ठेकेदारांमध्ये ऑफ रेकॉर्ड वाटून घेण्यात आला. पाच ठेकेदारांमध्ये मुंबई, औरंगाबाद, जालना, पुणे नागपूर येथील प्रत्येकी एक ठेकेदार आहे. शासनाच्या पॅकिंग पाउचमध्ये वस्तूंची अट रद्द केली गेली त्यामुळे डाळ कोणी पुरवली, तेल कुणी पुरवलं याचा रेकॉर्ड ठेवला जाणार नाही. एकही वस्तू कमी किंवा निकृष्ट दर्जाची आली तर त्याची जबाबदारी ठेकेदाराची नसून कंन्झुमर फेडरेशनची राहणार आहे. मग ही अशी शासनाची बदनामी करणारी अट काढणारा ‘खटके’ बहाद्दर अधिकारी कोण? याचीही चर्चा जोरात आहे.

उज्ज्वल स्पर्शाने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’
दिवाळी शिधा वाटपाची योजना ऑगस्ट महिन्यात अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अतिवरीष्ठ अधिकार्‍यांसमोर मांडण्यात आली. या बड्या अधिकार्‍याने ही योजना आपल्या ‘विवेकी उज्ज्वल’ मित्राला सांगितली. उज्वल स्पर्शाने एकहाती 517 कोटींचा ठेका घेतला खरा, पण अति गाजावाजा होत असल्याने हा ठेका गोंधळ घालणार्‍या अतिरिक्त तीन ठेकेदारांना ऑफ-रेकॉर्ड विभागाला गेला.