जनतेच्या समस्या सोडविण्यास पत्रकारांनी प्राधान्य द्यावे

0

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

मुंबई : सामान्य माणसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांकडे संपूर्ण समाजाचे लक्ष वेधण्याची प्रचंड क्षमता समाज माध्यमांमध्ये आहे; मात्र याचा वापर अनेकदा चुकीची, खोटी माहिती आणि चिथावणीखोरीचा प्रसार करण्यासाठी घातक पद्धतीनेही केला जातो. याचा प्रतिकूल परिणाम सामाजिक सुसंवाद, कायदा व सुव्यवस्था आणि देशातील एकतेवर होतो. त्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि लोकशाहीच्या सर्व स्तंभांनी या नवमाध्यमाच्या आव्हानांना सामुहिकपणे योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे. जनतेच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करायला हवा, असे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील पत्रकारिता अत्यंत प्रगल्भ अशी आहे. देशाच्या पत्रकारितेला दिशा देण्याचे काम राज्यातील पत्रकारितेने केले आहे. समाजात जातीयता, धर्मांधता, संकुचित वृत्तीला स्थान राहणार नाही हा दृष्टिकोन बाळगून पत्रकारांनी जबाबदारी पाडावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. भीमा- कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत माध्यमांनी लोकभावना उद्रेक होणार नाही याकडे लक्ष देत वृत्तांकन करण्याची विनंती केली होती. त्यास माध्यमांनी प्रतिसाद दिला याबद्दल माध्यमांचे त्यांनी अभिनंदन केले. पत्रकारांच्या निवृत्तीवेतनाच्या प्रश्नी शासन सकारात्मक आहे अशी माहिती देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण राज्यपाल राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, प्रविण दरेकर, अनंत गाडगीळ, विनायक मेटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे,कार्यवाह विवेक भावसार आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार, एबीपी माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांना राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार, दैनिक लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यासाठीचा पुरस्कार इंडियन एक्सप्रेसचे संदीप आशर यांना देण्यात आला. यावेळी सपाटे यांनी प्रास्ताविक केले. आभार भावसार यांनी मानले.