जनशक्ती विशेष : लता मंगेशकर यांचा जीवन प्रवास

गानकोकिळा लता मंगेशकर म्हणजे अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका. भारतीय चित्रपट-संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला. इंदूर येथे त्यांचा जन्म (28 सप्टेंबर 1929 ) झाला. मराठी रंग भूमीवरील तेजस्वी गायक नट मास्टर दीनानाथ ह्यांच्या ह्या ज्येष्ठ कन्या होत. दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा त्यांना लाभला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ च्या रंगमंचावर बालवयात लता मंगेशकरांनी छोट्या संगीत भूमिकाही केल्या.

 

भावबंधन या नाटकातील ‘कुसूम’ च्या भूमिकेत ‘लाडकी असेच थोर’ या ‘देसकारा’ तील पदाला त्यांना हमखास टाळी पडे. ‘नवयुग’ व ‘प्रफुल्ल’ या मराठी चित्रसंस्थांच्या बोलपटांत त्यांनी अशाच छोट्या संगीत भूमिका केल्या. पहिली मंगळागौर हा त्यांचा पहिला चित्रपट. यातील ‘मनू’ च्या भूमिकेत ‘नटली चैत्राची नवलाई’ किंवा ‘श्रावण आला तरूतरूला’ अशा समूहगीतांत त्यांचा आवाज होता. किती हंसाल ! या चित्रपटातील ‘नाचू या गडे खेळू सारी’ हे त्यांचे स्वतंत्र ध्वनिमुद्रित गीत होय. सुप्रसिद्ध कथ्थक नर्तकी रोहिणी भाटे यांच्यासाठी आपकी सेवामें या चित्रपटात त्यांनी म्हटलेले ‘पा लागू कर जोरीरे’ हे त्यांचे हिंदी चित्रसृष्टीतील पहिले पार्श्चगीत.

मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत. अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सुमारे 1,800 वर चित्रपटांतील विविध रंग-ढंगांची सुमारे 22 भाषांतील गाणी त्यांनी म्हटलेली असून, त्यांची संख्या सुमारे 25 ते 30 हजारांच्या घरात सहज जाते. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणार्‍या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्समध्ये ‘जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना ‘पद्मभूषण’ यासह विविध मानाचे जगविख्यात पुरस्कार मिळाले. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी मराठी चित्रपटांना वैशिष्ट्यपूर्ण संगीतही दिले. त्या कोल्हापूरच्या ‘जयप्रभा स्टुडिओ’ च्या संचालिका, तसेच ‘सुरेल चित्र’ या संस्थेच्या निर्मात्या होत्या.