एका आरोपीला भुसावळात पकडले : दुसरा संशयीत पसार
भुसावळ- 15268 एलटीटी-रखसोल (जनसाधारण) एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण डब्यातील परप्रांतीय प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांच्याकडील मोबाईल व रोकड लुटण्याची घटना नाशिक-भुसावळ स्थानकादरम्यान मंगळवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. भुसावळ स्थानकावर गाडी आल्यानंतर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एका चोरट्यास पकडण्यात यश आले. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करून तो नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
जेवणाच्या कारणावरून वाद करीत लूट
तक्रारदार मुन्नाकुमार चंद्रदेव शहा (27, रा.राजवाडा, जि.मुजफ्फरपूर) हे कुर्ला ते मुजफ्फरपूर तर सहप्रवासी तिरथ पाल (डोणखरी, उत्तरप्रदेश) हे नाशिक ते ईगतपुरी दरम्यान जनसाधारण एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करीत असताना संशयीत आरोपी साहेबराव गाढेकर (30, रा.सातगाव खुर्द, जि.जालना) व त्याच्या सोबतच्या अज्ञात साथीदाराने जेवणावरून वाद घालत शहा व पाल या प्रवाशांना मारहाण केली तसेच रोकड व मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी नकार दिल्याने दोघांच्या हातावर तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकारानंतर गाडीतील प्रवासी भयभीत झाले तर भुसावळ स्थानकावर मंगळवारी रात्री उशिरा गाडी प्लॅटफार्म क्रमांक सहावर आल्यानंतर एक आरोपी पसार झाला तर दुसरा आरोपी साहेबराव गाढेकर यास लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीने पकडले. आरोपींनी शहा यांच्याकडील दोन हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल तर नऊ हजारांची रोकड लांबवली. अटकेतील आरोपीच्या अंग झडतीतून मोबाईल तसेच सात हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. स्थानकावर तैनात किशोर वाघ व दीपक वटाणे यांनी आरोपीला लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरे यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.