जनाधारचे उपोषण सुटले ; मागण्यांबाबत 15 दिवसात चौकशीचे उपजिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

0

माजी आमदार संतोष चौधरींसह नगरसेवकांना दिलासा ; राष्ट्रवादीने दिला उपोषणाला पाठिंबा

जळगाव- भुसावळातील भाजपाच्या सत्ताधार्‍यांच्या काळात अवघ्या दोन ते पाच मिनिटात झालेल्या सर्व बेकायदा सभा व विशेष सभा रद्द कराव्यात, अमृत योजनेची चौकशी करावी, गोरगरीबांना घरकुलांचे वाटप करावे, शहराती नाल्यांची स्वच्छता करावी, अण्णाभाऊ साठे महामंडळ व महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाची चौकशी करावी, भुसावळ पालिकेला मिळालेल्या खोट्या पुरस्काराची चौकशी करावी यासह अन्य विविध मागण्यांसाठी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह जनाधारचे नगरसेवक शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी उपेाषणार्थींची भेट घेत मागण्यांसंदर्भात 15 दिवसात चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात आश्‍वासन दिल्याने उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतले. याप्रसंगी उपजिल्हाधिकार्‍यांसह नगरपालिका विभागाचे चंदनकर, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, रवींद्र भैय्या पाटील आदींनी चौधरींना उसाचा रस दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

संपूर्ण मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण
जनआधारने केलेल्या मागण्या रास्त असून त्याबाबत चौकशी होवून कारवाई न झाल्यास तसेच बेकायदा सभा रद्द न झाल्यास पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू, असा इशारा माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. जनतेच्या घामाच्या पैशांचा अपहार खपवून घेणार नाही, दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नाही, असेही ते म्हणाले.