पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील हृदयद्रावक घटना ः घटनेचे नेमके कारण अस्पष्ट ः गुन्हा दाखल, संशयित पिता ताब्यात
पाचोरा – हलाखीची परिस्थिती त्यातच तीन मुलींचा जन्म…त्यांचे पालनपोषण कसे करायचे…या विवंचनेत जन्मदात्या पित्याने दोन मुलींसह 50 फूट
विहिरीत फेकून यानंतर स्वतः उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक व हृदयद्रावक घटना बुधवारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे घडली. या
घटनेत दोघा मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला असून वेळीच प्रकार लक्षात आल्याने ग्रामस्थांमुळे पिता बचावला आहे. तनुश्री विकास ढाकरे (वय 10) व शिवन्या विकास ढाकरे
(वय 4) या मयत दोघा बहिणींचे नाव असून विकास सुरेश ढाकरे( तेली) वय 40 असे बचावलेल्या पित्याचे नाव आहे. या घटनेने समाज मन सुन्न झाले असून सर्वत्र
हळहळ व्यक्त होत आहे.
शाळेतून तांदूळ आणतो म्हणत पडला घराबाहेर
पिंपळगाव येथील विकास ढाकरे हा मोलमजुरी करुन उदरनिर्वाह भागवितो. तीन मुली असून त्याची पत्नी आरती ही गरोदर आहे. 22 रोजी सकाळी सात वाजता मुलींचे पोषण आहाराचे तांदुळ घेऊन येतो असे पत्नीला सांगून विकास तनुश्री व शिवन्या या मुलींना सोबत घेवून घराबाहेर पडला. यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्याने दोन्ही मुलींना आपण शेळीसाठी चारा घेवून येवू असे सांगत गावाबाहेर एक किलोमीटर भटकाविले. यादरम्यान एक दुचाकी आली असता, विकासने मला व मुलींना सोबत घेवून चला असे दुचाकीस्वाराला सांगितले. दुचाकीस्वाराने तिघांना बसवून घेतले. यादरम्यान जवखेडा शिवाराजवळ विकास मुलींसह उतरला.
कबूतर दाखवितो सांगत मुलींना विहिरीत ढकलले
दुचाकीवरुन उतरल्यावर विकास आपल्या दोघा मुलींसह जवखेडा शिवारात पाचोरा येथील अरविंद केशवराव शिंदे याच्या विहिरीजवळ गेला. विहिरीत कबूतर दाखवितो असे
सांगत दोघा मुलींना विहिरीजवळ नेले. काही कळण्याच्या आत त्याने सुरुवातीला मोठी मुलगी तनुश्री हिला विहिरीत ढकलेले. यानंतर लहान मुलगी शिवन्याही ढकलून
तिच्या पाठोपाठ विहिरीत उडी मारली.
मुलींना सोडून विहिरीतून निघाला बाहेर
50 फूट खोल असलेल्या विहिरीत 25 फूटापर्यंत पाणी आहे. मुली पाण्यात बुडाल्यानंतर विकास विहिरीतून बाहेर आलेला पाईपाला धरुन बाहेर आला. यानंतर बाहेर आल्यानंतर त्यानेच त्याचे गावातील मामा रतन तेली यास मोबाईलवरुन फोन करत मी माझ्या दोघा मुलींना विहिरीत फेकून त्यांचा जीव घेतल्याची माहिती दिली. रतन तेली यांनी गंभीर प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र बागुल यांनी शिंदाड येथील पोलीस पाटील ऐश्वर्या श्रीकृष्ण पाटील ायंना घटनास्थळी जावून खात्री करण्यासा सांगितले. खात्री झाल्यावर ऐश्वर्या पाटील यांनी कैलास मांडोळे या पट्टीच्या पोहणार्या तरुणाच्या मदतीने दोघा मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. पोलीस पाटील ऐश्वर्या पाटील यांनी पोलिसांना घटनेची माहिती पोलिसांना देत स्वत: हा फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. पिंपळगाव पोलीसांनी तातडीने संशंयीत आरोपी विकास ढाकरे यास ताब्यात घेतले असून घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे हे करीत आहेत,मयतांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले.
अप्पर पोलिस अधीक्षकासह डीवायएसपी ठाण मांडून
गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार चंद्रकांत ब्राम्हणे,सचिन पवार, सचिन वाघ, देवेंद्र दाते, अजयसिंग राजपूत या कर्मचार्यांसह घटनास्थळी माहिती जाणून घेतली. शेवटचे वृत्त आले तोपर्यंत अप्पर पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक हे पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात ठाण मांडले.