बारामती । आरोग्यसेवा ही ईश्वरसेवा असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारा रूग्ण हा आपल्यावर विश्वास ठेवून उपचारासाठी येतो. त्याला प्राधान्याने उपचार देऊन आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करावे. ज्या आदर्श व्यक्तींच्या नावे आपण पुरस्कार स्विकारतो त्यांचा कामाचा, विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे. असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दिला जाणारा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार यंदा जिल्ह्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते होते. आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रविण माने, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, विठ्ठल आवाळे यासह आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी फ्लॉरेन्स नाईटींगेल, सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक, कायाकल्प असे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
प्रविण माने म्हणाले, आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य सेवेचे हृदय आहेत. जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले. सुरज मांढरे म्हणाले, ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळतो त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्या, परमेश्वर हा वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपाने भेटत असतो. डॉ. दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले.
मला माहेरी आल्यासारखे वाटते
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाळ झाल्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आमदार झालो. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये येण्याची ही दुसरी वेळ आहे. ज्या ज्या वेळी मी जिल्हा परिषदेत येतो. त्यावेळी मला माहेरी आल्यासारखे वाटते, अशा भावना आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना भरणे यांनी जिल्हा परिषदेतील आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे मामांची जिल्हा परिषदेची ओढ’ अजून आहे. अशी हास्यविनोदी चर्चा रंगली.
मानधनाबाबत सकारात्मक विचार व्हावा
विश्वास देवकाते म्हणाले,परमेश्वर हा कोणत्या रूपात येईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे रूग्ण हाच परमेश्वर आहे असे समजून त्याची सेवा करा. आरोग्य विभागातील परिचारिका, कर्मचारी, आशा, यांच्या मानधनाबाबत सकारात्मक विचार व्हावा. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात काम करत असताना वरिष्ठांविषयी किंवा अन्य कोणतीही समस्या, अडचणी असल्यास थेट मला सांगाव्यात.