जपानच्या पंतप्रधानांचे मोदींनी केले स्वागत!

0

अहमदाबाद । जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पत्नी अकी आबेसह दोन दिवसीय भारत दौर्‍यावर आले असून, अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आबे यांचा ’गार्ड ऑफ ऑनर’ने सन्मान करण्यात आला. गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या विविध कलांचे रंगारंग दर्शन यावेळी आबे यांना घडले. रोड शो सुरू झाल्यानंतर जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे आणि त्यांच्या पत्नी भारतीय पेहरावात समोर आल्या. रोड शोदरम्यान गुजराती दांडिया, गरबा नृत्याचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच देशातील विविध भागांतील पारंपरिक नृत्यदेखील सादर करण्यात आले. देशातील विविधतेतील एकतेचे यावेळी दर्शन घडवण्यात आले.

आज बुलेट ट्रेनचे भूमिपूजन
खरंतर शिंजो आबे यापूर्वीही भारतात आले आहेत. पण यावेळी त्यांचा दौरा भारतासाठी खास आहे. या दौर्‍यात शिंजो आबे भारताला बुलेट ट्रेनची भेट देणार आहेत.आपल्या दोन दिवसांच्या दौर्‍यात शिंजो आबे गुजरातमध्येच राहणार आहेत. मोदी आणि आबे यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

संरक्षण सामग्रीची होणार समृद्धी
जपानसोबत सैन्य सहकार्य वाढवण्यासह भारतास शस्त्रास्त्रे अन्य सामग्रीच्या स्थानिक निर्मितीवर भर देण्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यातून संरक्षण सामग्री बनवणार्‍या जपानी कंपन्यांशी भारतात लढाऊ विमाने पाणबुड्या बनवण्याच्या प्रकल्पांवर चर्चा सुरू आहे.

आबे यांचे विमानतळावर शानदार स्वागत झाल्यानंतर मोकळ्या जीपमधून मोदी आणि शिंजो आबे यांचा रोड शो सुरू झाला. विमानतळ ते साबरमती आश्रम अशा या रोड शोसाठी आबे यांनी ’मोदी जॅकेट’ परिधान केले, तर अकी आबे यांनीही भारतीय पेहराव केला होता. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. लोकांना अभिवादन करत दोन्ही दिग्गज नेत्यांचा ताफा पुढे सरकला. हा अभूतपूर्व नजारा मोबाइल कॅमेर्‍यात टिपण्याचा मोह अकी आबे यांना आवरला नाही. साबरमती आश्रमात दाखल झाल्यानंतर आबे, त्यांची पत्नी आणि पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली.